
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी माध्यमांना माहिती दिली की, हिंदुस्थानातील ‘माझे मित्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची ‘अत्यंत चांगली चर्चा’ झाली आहे. ट्रम्प हे मंगळवारी दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये फोनवरून झालेल्या संभाषणाबद्दल बोलत होते.
अमेरिकेतील कर कपातीवरील एका बैठकीला संबोधित करण्यासाठी ट्रम्प लास वेगासकडे निघाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘माझी त्यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. ते हिंदुस्थानातील माझे मित्र आहेत आणि ते उत्तम काम करत आहेत. आमच्यात अत्यंत सकारात्मक संभाषण झाले’.
द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी आणि आखातातील परिस्थितीवर मते जाणून घेण्यासाठी ट्रम्प यांनी मंगळवारी मोदींना फोन केला होता. आखातामध्ये सध्या अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध पुकारले आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराणने ७ एप्रिल रोजी दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केला होता. आता दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता चर्चा सुरू असून, इराणने अण्वस्त्र निर्मितीचा हट्ट सोडून द्यावा आणि युरेनियमचा साठा अमेरिकेकडे द्यावा, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
इराणसोबतच्या या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर चांगलेच वाढले आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनी रोखल्यामुळे कच्च्या तेल पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला. मंगळवारी झालेल्या या फोनवरील संभाषणादरम्यान, ट्रम्प आणि मोदी या दोन्ही नेत्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला.
हिंदुस्थानातील अमेरिकेचे राजदूत सर्गेई गोर यांच्या मते, दोघांमध्ये ४० मिनिटांचे संभाषण झाले. हे संभाषण संपवताना ट्रम्प यांनी मोदींना ‘आम्हा सर्वांचे तुमच्यावर प्रेम आहे’, असेही म्हटल्याचे सांगितले. २८ फेब्रुवारी रोजी इराणसोबत युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही नेत्यांमधील दोनवेळा फोन चर्चा होती.


























































