
इराण, अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आखातामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. इराणने पूर्व भागातील हवाई क्षेत्राचा काही भाग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने शनिवारी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर इरामधील 6 विमानतळांवरील कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. असे असले तरी विमान कंपन्या अद्याप खबरदारी म्हणून या मार्गाचा वापर करणे टाळत असल्याचे ‘फ्लाइट ट्रॅकर’ संकेतस्थळांनी नमूद केले आहे.
‘असोसिएशन ऑफ इराणी एअरलाईन्स’ने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमधील इमाम खामेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ यासह मशहाद, बिरजंद, गोरगन आणि झाहेदान येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विमान सेवा पुन्हा सुरू झाली आहे. ‘तस्नीम’ वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिल्याचे वृत्त ‘मनी कंट्रोल‘ने दिले आहे.
इस्रायल आणि अमेरिकेने 28 फेब्रुवारीला केलेल्या हल्ल्यांनंतर इराणने आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली होती. मात्र आता इराणच्या पूर्व भागातील हवाई मार्ग आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी खुले करण्यात आले आहेत. काही महत्त्वाचे विमानतळही पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव अद्यापही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी या मार्गाचा जास्त वापर केल्याचे वृत्त नाही.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे महत्त्वाची माहिती दिली. युद्धविराम कालावधीत होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून सर्व व्यावसायिक जहाजांना मुक्त संचाराची परवानगी देण्यात आली आहे. जगातील सर्वाधिक तेल वाहतूक याच मार्गावरून होत असल्याने हा निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक मानला जात आहे. यापूर्वी इराणने केवळ मोजक्याच जहाजांना येथून जाण्याची मुभा दिली होती तर अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांवर पूर्णपणे बंदी घातली होती.





























































