Iran US War – बुधवारपर्यंत करार केला नाही, तर पुन्हा बॉम्ब पडणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला बेचिराख करण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला आणि दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा झाली. पहिली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता सोमवारी दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. मधल्या काळात अमेरिकेने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करत असल्याचे म्हटले आणि आखातातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसू लागली. मात्र अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा बेचिराख करण्याचा इशारा दिला आहे. बुधवारपर्यंत करार केला नाही तर युद्धविराम संपुष्टात येईल आणि आम्ही पुन्हा बॉम्ब फेकण्यास सुरूवात करू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

फिनिक्स, ॲरिझोना येथील दौरा आटोपून वॉशिंग्टनला परतत असताना ‘एअर फोर्स वन’ विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली. शस्त्रसंधी वाढवायची की नाही, याबाबत मी अद्याप साशंक आहे. मात्र इराणच्या बंदरांवरील आमची नाकेबंदी कायम राहील. जर बुधवारपर्यंत तोडगा निघाला नाही, तर दुर्दैवाने आम्हाला पुन्हा बॉम्बफेक सुरू करावी लागेल, असे ते म्हणाले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अमेरिका-इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले आणि आखातामध्ये युद्ध पेटले. अमेरिका-इस्रायलने इराणमध्ये तुफान बॉम्ब हल्ले केले, त्यामुळे प्रचंड वित्तहानी आणि मनुष्यहानी झाली. या हल्ल्यांना इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले चढवले. तसेच आखातातील अमेरिकन सैन्य तळांनाही लक्ष्य केले. जवळपास दीड महिने हा संघर्ष सुरू होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघेल अशी आशा होती. मात्र दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने पहिली चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर आता येत्या दोन-तीन दिवसांमध्ये पुन्हा दोन्ही देश चर्चा करणार आहेत.

दरम्यान, जगाच्या एकूण तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के व्यापार होर्मुझच्या सामुद्रधनीतून होतो. अमेरिकेने एप्रिल महिन्यापासून इराणच्या बंदरांवर कडक नाकेबंदी लागू केली आहे. अमेरिकन नौदल इराणच्या बंदरात येणारी आणि जाणारी जहाजे परतवून लावत आहे. याच पार्श्वभूमीवर इराणनेही इशारा दिला आहे. जर अमेरिकेचा दबाव असाच कायम राहिला, तर होरमुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली जाऊ शकते, असे इराणने म्हटले आहे.

नाकेबंदी सुरूच राहिली तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार नाही; इराणने अमेरिकेला ठणकावलं, ट्रम्प यांचे ‘ते’ 7 दावेही खोडून काढले

बुधवारी काय होणार?

दुसरीकडे ट्रम्प यांनी बुधवारपर्यंत करार झाला नाही तर पुन्हा बॉम्बफेक सुरू करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात चिंतेचे वातावरण आहे. जर बुधवारी चर्चा यशस्वी झाली नाही आणि संघर्षाला सुरुवात झाली, तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.