चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आणखी एकाला आग्रा येथून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाॅलीवुडमधील ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या, गोळीबारात नुकतेच एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश विशेष कृती दलाच्या (STF) आणि मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गुरुवारी एका गुन्हेगाराला अटक केली. जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत निवेदनानुसार, प्रदीप कुमार ऊर्फ ‘गाठ’ अशी ओळख असलेल्या या आरोपीला गुरुवारी दुपारी ३.५६ वाजता आग्रा येथील ‘बाह’ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, आग्रा-एटा रस्त्यावरील ‘छदामी मठा’ परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप कुमार उर्फ ​​गाठ गोळीबाराच्या ठिकाणी उपस्थित होता आणि घटनेपासून फरार होता. पोलीस अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते आणि अखेरीस त्याला आग्रा येथे अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या अटकेनंतर आता रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात आतापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी, पोलिसांनी गोळीबार करणारा, शस्त्र पुरवठादार आणि रसद पुरवणाऱ्यासह १४ आरोपींना अटक केली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. गोळीबारामागील कारण हे खंडणी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपींना पैशांचे आमिष दाखवून हा गुन्हा करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. मुख्य शूटर, दीपक शर्मा याला १५ लाख रुपयांचे आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकी ५० हजार रुपये आगाऊ देण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या ‘शेट्टी टॉवर’ येथे हा गोळीबार झाला होता.