सामना अग्रलेख – कामगार आंदोलनात पाकिस्तान, भाजपची विकृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकड्यांनी पुलवामा आणि पहेलगाम येथे असंख्य हिंदूंना ठार केले. त्या अतिरेक्यांचा शोध घेऊ न शकणारे राज्यकर्ते ग्रेटर नोएडा येथील कामगार आंदोलनात पाकिस्तानी घुसल्याच्या बोंबा मारतात हे त्यांच्या डरपोक मानसिकतेचे लक्षण आहे. ही मंडळी पाकिस्तानला संपवायला निघाली होती. तशा वल्गना त्यांनी नेहमीच केल्या, पण शेतकरी, कामगार, विद्यार्थी, विद्यापीठांत पाकिस्तानी घुसले या विचाराने हे दचकून जागे होतात. नोएडातील कामगार आंदोलनात पाकिस्तानी घुसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी करणे हा भारतातील श्रमशक्तीचा भयंकर अपमान आहे. अर्थात त्यांच्या मनात, पोटात, डोक्यात, ओठांत, नसानसांत पाकिस्तानच आहे. तेव्हा हे काय पाकड्यांना धडा शिकवणार?

भाजपच्या जन्माचा पाळणा बहुधा पाकिस्तानात हलला असावा. कारण ऊठसूट प्रत्येक ठिकाणी त्यांना पाकिस्तानचाच हात दिसतो. दिल्लीजवळच्या गेटर नोएडाच्या औद्योगिक क्षेत्रात हजारो कामगार त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले. महागाईने होरपळून निघाले तरी या कामगारांचा पगार 12,000 ते 15,000 च्या वर जात नाही. भाडे, धान्य, शिक्षण, औषधे, प्रवास, गॅस सिलिंडर सर्वकाही महागले तरी वार्षिक वेतनवाढ फक्त 300 रुपये. हे निर्घृण आहे. जगण्यापुरते वेतन द्या, या मागणीसाठी कामगार रस्त्यावर उतरले. त्यांच्या भावनांचा स्फोट झाला. हिंसेची ठिणगी पडली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी गाड्या जाळल्या, कुठे दगडफेक झाली. हे बहुसंख्य मजूर, कामगार हिंदूच होते, पण उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला कामगारांच्या या आंदोलनात पाकिस्तानी एजंटांचा हात दिसू लागला आहे. उत्तर प्रदेशचे श्रममंत्री अनिल राजभर यांनी तर यानिमित्ताने पाकिस्तानच्या नावाने भलतेच खडे फोडले. कामगारांचे आंदोलन हे सुनियोजित कारस्थान असून त्यामागची पाकिस्तानी लिंक तपासली जात आहे, असे या महाशयांनी जाहीर केले. बहुधा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाही तसेच वाटत असावे. पाकिस्तानचे अस्तित्व नसेल तर ‘भाजप’ राजकीय कुपोषणाने मरून जाईल. पाकिस्तान, मुसलमान हाच भाजपचा राजकीय दाणा-पाणी, दवा-दौलत आहे. कामगारांच्या आंदोलनातही यांना पाकिस्तानचा ‘हात’ दिसत असेल तर हे मोदी सरकारचे अपयश आहे. बारा वर्षे यांचे राज्य केंद्रात व उत्तर प्रदेशात असताना हे लोक पाक एजंटांचा बंदोबस्त करू शकले नाहीत व त्याचे खापर

कामगार आणि शेतकरी

वर्गावर फोडत आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केले होते. तेव्हाही शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाकिस्तानी व दहशतवादी घुसले आहेत, असा शोध या लोकांनी लावला होता. प. बंगाल, आसाममध्येही बांगलादेशी घुसले असे ते निवडणूक प्रचारात बोलत आहेत, पण गेली बारा वर्षे देशाच्या सीमांचे चौकीदार हेच भाजपवाले आहेत. बारा वर्षे झाली तरी हे बांगलादेशी घुसखोरांना थांबवू शकले नाहीत. याचा अर्थ तुम्ही राज्यकर्ते म्हणून नालायक ठरला आहात. देशातून ‘माओवाद’, नक्षलवाद संपवला याचे श्रेय गृहमंत्री अमित शहा घेत आहेत. मग पाकिस्तानी एजंट किंवा हॅण्डलर्सना का संपवू शकला नाहीत? मुळात सत्य असे आहे की, तुम्हाला राज्य करता येत नाही व कष्टकरी संतापला की पाकड्यांना दोष द्यायचा, ही राजकीय लंपटगिरी आहे. शेतकरी, कामगारांच्या श्रमाचे चीज मोदी-शहांना नाही. नोएडा ही दिल्लीची उपनगरीय औद्योगिक राजधानी आहे. इथे इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईलसारख्या क्षेत्रांत लाखो मजूर काम करतात व ते बहुसंख्य हिंदू आहेत. त्यांचे आर्थिक प्रश्न आहेत व ते वेतनाशी निगडित आहेत. सध्याच्या भीषण महागाईच्या काळात त्यांनी जगायचे कसे, हा गंभीर प्रश्न आहे. पुन्हा त्यांचे एकप्रकारे आर्थिक शोषण सुरू आहे. मालक व सरकार त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उरला होता. आता या आंदोलनात हिंसाचार झाला तर सरकारने निंदा करावी, कायद्याने कारवाई करावी, पण अशा प्रत्येक आंदोलनाला ‘पाकिस्तानी षड्यंत्र’ ठरवणे हे

सरकारचे अपयश

आहेच, पण कामगार वर्गाचाही अपमान आहे. कामगारांच्या शोषणाची स्थिती भारतभर आहे. कामगारांना, असंघटित मजूरवर्गाला आज कोणाचेही संरक्षण राहिलेले नाही. कायदे कामगारांच्या विरोधात आहेत व अदानींसारख्या भांडवलदारांच्या सोयीचे आहेत. अशा वेळी शेतकरी, कामगारांनी त्यांच्या मुलाबाळांसह आत्महत्या कराव्या काय? परदेशी गुंतवणूक येत आहे व त्यातून आर्थिक आणि उद्योग क्षेत्राची भरभराट होत आहे या फक्त भूलथापाच दिसतात. कष्टकरी, शिक्षक, महाराष्ट्रात एम.पी.एस.सी.चे विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलने करीत आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी त्याची एकदा तरी दखल घेतली काय? कष्टकऱ्यांचे हक्क नाकारणे हा अपराध आहे. याच कष्टकऱ्यांच्या त्यागातून आणि बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले व महाराष्ट्राला मुंबई मिळाली, पण हे स्वातंत्र्य कष्टकऱ्यांच्या फायद्याचे झाले नाही व मुंबईवर मजुरांचा हक्क राहिला नाही. उलट लढणाऱ्यांना पाकिस्तानी ठरवून भाजपवाले मोकळे झाले. पाकड्यांनी पुलवामा आणि पहेलगाम येथे असंख्य हिंदूंना ठार केले. त्या अतिरेक्यांचा शोध घेऊ न शकणारे राज्यकर्ते ग्रेटर नोएडा येथील कामगार आंदोलनात पाकिस्तानी घुसल्याच्या बोंबा मारतात हे त्यांच्या डरपोक मानसिकतेचे लक्षण आहे. ही मंडळी पाकिस्तानला संपवायला निघाली होती. तशा वल्गना त्यांनी नेहमीच केल्या, पण शेतकरी, कामगार, विद्यार्थी, विद्यापीठांत पाकिस्तानी घुसले या विचाराने हे दचकून जागे होतात. नोएडातील कामगार आंदोलनात पाकिस्तानी घुसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी करणे हा भारतातील श्रमशक्तीचा भयंकर अपमान आहे. अर्थात त्यांच्या मनात, पोटात, डोक्यात, ओठांत, नसानसांत पाकिस्तानच आहे. तेव्हा हे काय पाकड्यांना धडा शिकवणार?