
पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या एका विधानावरून आज सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत गोंधळ घातला. या वेळी सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे महापौर रितू तावडे यांनी महासभा तहकूब केली. सरकार आणि प्रशासनाकडून ‘महापौर’ पदाचा योग्य सन्मान राखला जात नसल्याच्या मुद्दय़ावरून सुरू झालेल्या चर्चेला यामुळे वेगळे वळण लागले.
राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर, उपमहापौर यांचा योग्य सन्मान राखला जात नसल्याबाबत शिवसेना नगरसेविका विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. या वेळी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा दिला. सभागृह नेते गणेश खणकर यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीही हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा दिला. मात्र याच वेळी त्यांनी विरोधकांकडूनच महापौरांचा अवमान केला जात आहे असे सांगत किशोरी पेडणेकर यांच्या विधानाचा विपर्यास केला. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
महासभेच्या सभांचे व्हिडीओ रेकार्ंडग करा – श्रद्धा जाधव
मुंबईकरांनी पालिकेत निवडून दिलेले नगरसेवक आपल्या प्रभागातील विकासकामांचे मुद्दे कशा प्रकारे मांडतात हे सर्वसामान्यांना कळावेत यासाठी महासभेच्या कामकाजाचे लाइव्ह व्हिडीओ रेकार्ंडग करा, अशी मागणी शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तीन आठडय़ांपूर्वी हरकतीची सूचना मांडूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
विरोधकांकडून नाहक राजकारण – पेडणेकर
शिवसैनिकांवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे संस्कार झालेले आहेत. काही जणांसारखे आम्ही ते विकत घेतलेले नाहीत, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला. सत्ताधारी पक्ष शिवसेनाप्रमुखांच्या नावाने राजकारण करीत आहे. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्याकडून सभागृहात विरोधकांसाठी उच्चारलेल्या असंसदीय शब्दाबाबत महापौर गप्प का, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.




























































