
>>वैश्विक, [email protected]
आज उडेल, उद्या उडेल करता करता ‘अर्टेमिस’ या चार अंतराळयात्री अवकाशात नेणाऱ्या बहुचर्चित यानाचे (यशस्वी) उड्डाण झाले. अर्थात अशी महत्त्वाची आणि त्यातही समानव याने अवकाशात पाठवताना असंख्य वेळा विचार आणि यानांची काटेकोर तपासणी करावी लागते. मानवरहित यान अवकाशात सोडताना काही गफलत झाली नि ते अयशस्वी ठरले तरी हानी होतेच. मात्र ती आर्थिक आणि तंत्रज्ञानातील त्रुटींची असते. त्याचा परिणाम काही काळ उदास होण्यात होतो. त्यापेक्षाही जास्त असं का घडलं याचा शोध घेण्यात होतो. उदासीकडून उमेदीकडे जात पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतात. याचं जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे विजेचा दिवा शोधणाऱ्या एडिसन यांचं. अनेक वेळा काचगोलकात वीज ‘स्थिर’ करण्याचे त्यांचे प्रयत्न फसले, पण म्हणून ते निराश झाले नाहीत. उलट ‘कोणकोणत्या मार्गाने विद्युतगोलक (बल्ब) बनवता येत नाही याचं ज्ञान मला झालं’ असं त्यांनी या अपयशाचं वर्णन केलं. याला म्हणतात पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक विचारसरणी.
अमेरिका, रशियासह अनेक देशांचे प्रारंभीचे अग्निबाण (रॉकेट) अयशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी तंत्रज्ञान अधिकाधिक योग्य बनवत आपलं ध्येय गाठलं. त्यामुळेच युरी गागारिन प्रथमच अंतराळात आणि नील आर्मस्ट्राँग, एडविन (बझ) ऑल्डिन पहिल्यांदा चंद्रावर जाऊ शकले. रशिया-अमेरिकेच्या महासत्तेच्या ‘शीतयुद्धा’तून बरं काही घडलं असेल तर ते म्हणजे अंतराळ संशोधनाला आलेली गती आणि खगोलशास्त्राचा झालेला विकास.
20 जुलै 1969 रोजी माणूस चंद्रावर उतरला. त्याची ‘कॉमेन्टरी’ आमच्या पिढीने त्याचक्षणी रेडिओवर ऐकली आणि अमेरिकन, युरोपीय लोकांनी टीव्हीवर ती अद्वितीय घटना ‘याचि डोळा’ पाहिली. त्या चांद्रवीरांना मुंबईत पाहण्याचं भाग्यही लाभलं! पुढे 1972 पर्यंत अमेरिकेने 12 अंतराळयात्री चंद्रावर पाठवले. त्यात फक्त पुरुष यात्रीच होते. अमेरिकेची ही मोहीम 1972 पर्यंत चालली. इतर कोणत्याही देशाने आजतागायत चंद्रावर माणूस पाठवलेला नाही. रशियाने ‘ल्युनोखोद’सारखी यानं पाठवून दूरस्थपणे चंद्र जाणून घेतला. आपल्या ‘चांद्रयान’ मोहिमेनेही तसेच केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवभागात उतरणारं आपलं यान हा जागतिक विक्रम होता. चंद्रावरील पाण्याच्या शोधातही ‘चांद्रयान’ने निर्णायक भूमिका बजावली. आजपर्यंत एकही महिला मात्र चंद्राच्या दिशेने अंतराळयात्री म्हणून गेलेली नव्हती. पहिल्या चांद्रविजयाची ‘साठी’ दृष्टिपथात आलेली असताना ‘नासा’ या अमेरिकन अंतरीक्ष संस्थेला आपल्या पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या चांदोबाची पुन्हा एकदा आठवण आली आणि ‘अर्टेमिस’ नावाच्या अंतराळी मोहिमा सुरू झाल्या. त्यातून मग 16 नोव्हेंबर 2022 रोजी अर्टेमिस-1 हे यान चांद्रकक्षेच्या दिशेने झेपावलं. ते सुमारे तीन आठवडे चंद्राभोवती फिरलं. (त्यात येण्याजाण्याचा प्रवासही आलाच.)
अर्टेमिस-1 मध्ये माणसं नव्हती तर माणसांसारखे तीन ‘बुद्धिमान’ यांत्रिक पुतळे (मॅनेकिन) होते. त्यांच्या ‘कॅप्टन’चं नाव ‘मूनिकिन कॉम्पस’ असं होतं. या अतिशय क्रियाशील मानवी प्रतिकृती ओरायन कॅप्सुलमध्ये विराजमान केल्या गेल्या होत्या. दुसरे दोन होते हेल्गा आणि झोहॅर. त्यांच्या ‘निर्मिती’ची कथा पुन्हा केव्हातरी. मानवी शरीरावर अंतराळानुभवाचा होणारा परिणाम, स्टेम सेल’वरचे प्रयोग इत्यादी संशोधन त्यांनी केलं.
अर्टेमिस-2 मात्र ज्या ‘ओरायन’ला घेऊन दहा दिवसांच्या चांद्रपरिक्रमेसाठी गेलं त्यात मात्र रीड वाइजमॅन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्तीना कॉक हे अमेरिकन, तर कॅनडाचे जेरेमी हॅनसन हे स्वार झाले होते. क्रिस्तीना चंद्राचं जवळून दर्शन घेणारी पहिली महिला चांद्रमोहीम यात्री ठरली. यात कमांडर आहे वाइजमॅन, ग्लोव्हर हा पायलट आणि प्रकल्पतज्ञ म्हणून क्रिस्तीना आणि जेरेमी यांनी काम केलं. 11 एप्रिलच्या पहाटे हे चांद्रयात्री पृथ्वीवर सुखरूप परतले.
या दहा दिवसीय मोहिमेत या अंतराळवीरांच्या मनगटावर असलेल्या एका वैशिष्टय़पूर्ण (एआरसीएचइआर) या घडाळ्याने त्यांचं क्षणोक्षणी आरोग्य निरीक्षण केलं. हा सूक्ष्म तपशील पुढच्या सर्व समानव मोहिमांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सूर्याच्या प्रखर अतिनील किरणांचा संभाव्य (पर्यटकही) अंतराळयात्रींवर कोणता परिणाम होऊ शकतो याची सखोल नोंद झाली. 600 सेन्सरनी ते काम यशस्वीरीत्या केलं.
या अंतराळयात्रींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्राची दुसरी बाजू प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आजवर कोणाला लाभलं नव्हतं ते या चौघांना लाभलं. ते सर्व त्यांनी कॅमेराबद्ध केल्याने आता आपल्यालाही चंद्राने त्यांच्या पृथ्वीशी असलेल्या ‘सिन्क्रोनस’ (एकरूप) गतीमुळे दडवलेली रहस्ये उलगडतील. चंद्राचा ‘खरा चेहरा’ पूर्णांशाने समजण्यास मदत होईल. अशा प्रकारची चांद्र संशोधन आणि अंतराळ अभ्यास उड्डाण इतर देशांनीही करावी म्हणून अमेरिकेने ‘अॅर्टेमिस अॅकॉर्ड’ (करार) अनेक देशांशी केला आहे. अर्टेमिस-2 च्या अंतराळयात्रींना पूर्वीचाही अंतराळी अनुभव आहे. कमांडर वॉइजमॅन अंतराळात 165 दिवस, ग्लोव्हर 168 दिवस आणि क्रिस्तीना तर तब्बल 328 दिवस अंतराळ निवासाचा विक्रम करणारी महिला आहे. जेरी हॅसन फायटर पायलट असून तो मात्र अंतराळ प्रवासाला प्रथमच गेला होता. काही अडचणींचाही सामना या अंतराळयात्रींना करावा लागला खरा, पण आता ही मोहीम फत्ते झाली आहे. हे सारं चंद्रसाक्षीने घडलंय. त्यांचं अभिनंदन!



























































