Ratnagiri News – जिल्ह्यात शिक्षकांचे पगार रखडले, शासकीय यंत्रणेचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे पगार रखडले आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शालार्थ प्रणाली आणि संच 2024-25च्या पदांमध्ये बदल दिसत असल्याने आणि काही अन्य तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन संच मान्यतेतील त्रुटींमुळे शिक्षकांची पगार बिले फॉरवर्ड होत नसल्याने जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार रखडले आहेत.

या आधी ही बिले फॉरवर्ड केल्यावर शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक कोल्हापूर लॉग इनला बिले जात होती. त्या ठिकाणी मंजूर झाल्यावर उशिराने शिक्षकांना पगार मिळत होता. यासाठी देखील शिक्षक वर्गाला फेऱ्या माराव्या लागत होत्या. सध्या शिक्षणाधिकारी व उपसंचालक स्तरावरील टॅब बंद करून ठेवण्यात आला आहे. यामुळे शिक्षकांचे पगार अद्याप झालेले नाहीत. काही ठिकाणी शालार्थ आणि 2024-25 च्या संचमान्यतेत असलेली प्रयोग शाळा सहाय्यकांची संख्या वेगवेगळी दिसत असल्याने, शिक्षकांचे सरसकट पगार रोखून ठेवण्यात आले आहेत.

वास्तविक पाहता शालार्थ प्रणाली आणि संच मान्यता ह्या दोन्ही एकाच कार्यालयाच्या बाबी आहेत. डिजिटलायझेशनच्या नावाखाली कार्यालयाकडून नाहक वेळकाढूपणा करण्यात येत आहे. यामध्ये शिक्षकांना विनाकारण वेठीस धरण्यात येत आहे. यामध्ये टप्पा अनुदानावर असलेले शिक्षक हे तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. यातूनच ते घरचा प्रपंच चालवत असतात. यामुळे सध्या टप्पा अनुदानावरील शिक्षक अडचणीत आले आहेत. रखडलेले पगार तात्काळ करा अशी मागणी संतप्त शिक्षकवर्गातून होत आहे.