मी होर्मूझ कायमस्वरुपी खुले करतोय; ट्रम्प यांचा पुन्हा नवा दावा, चीनबाबतही केले मोठे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आखाती युद्ध सुरू झाल्यापासून अनेक दावे करत आहेत. त्यातील अनेक दावे फोल ठरले असले तरीही त्यांच्या या दाव्यांमुळे जगभरातील परिस्थितीवर लगेचच परिणाम दिसून येतो. आता ट्रम्प यांनी नवा दावा केला असून त्यात त्यांनी चीनबाबतही महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये अशी घोषणा केली आहे की, मी हार्मूझ कायमस्वरुपी खुले करतोय, चीनसाठी आणि जगासाठी, त्यांच्या या ट्विटची जगभरात चर्चा होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, ते होर्मुझची सामुद्रधुनी कायमस्वरूपी खुली करत आहेत. या घटनेने चीनला सर्वाधिक आनंद झाला आहे. त्यामुळे जेव्हा त्यांची व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होईल, तेव्हा जिनपिंग त्यांना आनंदाने अलिंगन देतील. चीनसोबतचा संघर्ष वाढत असताना ट्रम्प यांच्या या ट्विटची चर्चा होत आहे.

अमेरिकेच्या लष्कराने यापूर्वी दावा केला होता की, सोमवारी नाकेबंदी सुरू केल्यापासून त्यांना आखाती सागरी हद्दीत वर्चस्व प्राप्त झाले आहे. इस्लामाबादमध्ये गेल्या आठवड्याच्या शेवटी झालेली अमेरिका-इराण चर्चा निष्फळ ठरल्याच्या पार्श्वभूमीवर ही नाकेबंदी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिका इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी होण्याचे वृत्त होते. त्यानंतर आता ट्रम्प यांनी हे ट्विट केले आहे.

मी होर्मुझची सामुद्रधुनी कायमस्वरूपी खुली करत आहे, याबद्दल चीन खूप आनंदी आहे. मी हे त्यांच्यासाठीही करत आहे – आणि जगासाठीही. अशी परिस्थिती पुन्हा कधीच उद्भवणार नाही,” असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘Truth Social’ वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच चीनने इराणला शस्त्रास्त्रे न पाठवण्याचे मान्य केले आहे. काही आठवड्यांत जेव्हा मी तिथे जाईन, तेव्हा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मला आनंदाने अलिंगन देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्ही एकत्रितपणे अत्यंत हुशारीने आणि उत्तम प्रकारे काम करत आहोत! हे सहकार्य लढण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे,असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेने होर्मुझची नाकेबंदी केल्यानंतर आणि चीन इराणला शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचा आरोप अमेरिकेने केल्याने चीन चांगलाच संतापला होता. चीनने अमेरिकेला इशारा आणि धमकीही दिली होती. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा जागतिक समीकरणे बदलल्याचे दिसत आहे.