डेटिंगच्या जाळ्यात 500 महिला, दोन कोटींची फसवणूक, महाठग अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत एका ठगाने तब्बल 500 हून अधिक महिलांची सुमारे 2 कोटी रुपयांची फसवणूक केली. कधी डॉक्टर, तर कधी बिझनेसमॅन तर कधी निर्माता बनून शेकडो महिलांवर डेटिंगचे जाळे फेकले होते. महिलांची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकणी दिल्ली सायबर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

‘मॅच, डेट, ढोंग आणि फसवणूक’ या चार शब्दांभोवती पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील रहिवासी आनंद कुमार याचे आयुष्य फिरत होते. कुमार डेटिंग आणि मॅट्रिमोनिअल अ‍ॅप्सवर कधी डॉक्टर, कधी व्यावसायिक, चित्रपट निर्माता तर कधी वकील असल्याची खोटी ओळख सांगून महिलांशी संपर्क साधायचा. काही काळानंतर तो त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण करायचा आणि लग्नाचे आमिष दाखवायचा. काही प्रकरणांमध्ये त्याने मॉडेलिंगच्या संधी आणि नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासनही दिले होते. डेटिंगच्या काळात कुमार ओळख झालेल्या महिलेबरोबर भावनिक नाते निर्माण झाल्याचे नाटक करायचा.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून बिंग फुटले

एका पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यावर हे प्रकरण उजेडात आले. वैभव अरोरा नावाच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून एका व्यक्तीने लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिने केला. या दोघांची ओळख एका डेटिंग अ‍ॅपवर झाली होती. अरोराने तिला लग्नाचे वचन दिले आणि नंतर विविध कारणांनी तिच्याकडून पैसे उकळले. जेव्हा पीडितेने पैसे परत मागितले, तेव्हा त्याने प्रतिसाद देणे बंद केले. वैभव अरोरा याचा मृत्यू झाला असल्याचा दावाही त्या इंस्टाग्राम अकाउंटवरून करण्यात आला, अशी तक्रार महिलेने केली होती.