
पाकिस्तानने जहाजातून लॉन्च होणाऱ्या अँटी शिप मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून गुरुवारी याबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. पाकिस्तानी नौदलाने ज्या अँटी शिप मिसाईलची चाचणी केली ती स्वदेशी बनावटीची आहे. या मिसाईलच्या यशस्वी चाचणीने देशाच्या लष्करी क्षमतेत मोठी झेप घेतल्याचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि नौदलप्रमुख अॅडमिरल नवीद अश्रफ यांनी सांगितले.
पाकिस्तानी लष्कराने सांगितले की, प्रत्यक्ष गोळीबार सरावावेळी या क्षेपणास्त्राने लांब पल्ल्यावरून आणि वेगवान गतीने आपल्या लक्ष्यावर अचूक मारा केला. ही मिसाईल पूर्वीच्या सिस्टिमपेक्षा अधिक मजबूत आहे. कारण त्यात एक एडवान्स गाइडेंस पॅकेज आणि उत्तम मॅन्यूवरेबिलिटी आहे. ही मिसाईल बाह्य धोके टाळण्यासाठी, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि अचूकतेने मारक हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पाकिस्तानचा क्षेपणास्त्र कार्यक्रम विशेषतः हिंदुस्थानला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार करण्यात आला आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. याआधी 10 जानेवारीला पाकिस्तानी नौदलाने उत्तर अरबी समुद्रात एका नौदल सरावात हवेत मारा करणारी मिसाईल चाचणी केली होती. या काळात नौदल युद्धाच्या बदलत्या पद्धतींनुसार पारंपरिक आणि मानवरहित अशा दोन्ही क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले.




























































