इंडोनेशियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; 6 प्रवाशांसह 8 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडोनेशियातील पश्चिम कालीमंतन प्रांतात गुरुवारी एक भीषण हेलिकॉप्टर अपघात घडला. एअरबस एच130 हे हेलिकॉप्टर कोसळून त्यातील सहा प्रवासी आणि दोन कर्मचारी अशा एकूण आठही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंडोनेशियाच्या बचाव संस्थेचे प्रमुख मोहम्मद शफीई यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, सध्या बचाव पथके अपघातग्रस्त ठिकाणाहून मृतदेह आणि ढिगारा बाहेर काढण्याचे काम करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मेलावी येथील एका मळ्यामधून उड्डाण केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. हे हेलिकॉप्टर ‘मॅथ्यू एअर नुसंतारा’ कंपनीचे होते आणि ज्या ठिकाणाहून याने उड्डाण केले, तो भाग ‘चित्रा महकोटा’ या पाम तेल कंपनीच्या मालकीचा आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो प्रदेश अत्यंत घनदाट जंगल आणि उंचसखल डोंगराळ भाग आहे. बचाव पथकाला शोधकार्यादरम्यान संपर्क तुटलेल्या ठिकाणापासून सुमारे 3 किलोमीटर पश्चिमेला हेलिकॉप्टरच्या शेपटीचा भाग असल्याचा संशय असलेला ढिगारा सापडला आहे. शुक्रवारी लष्कर, पोलीस आणि बचाव पथकातील कर्मचारी जमिनीमार्गे या दुर्गम अपघातस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.