
अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. रिदम पांचाळ ऊर्फ माँटी पांचाळ असे त्याचे नाव आहे. माँटी पूर्वी जिम ट्रेनर होता.
आपल्या अंगात देव येतो, तुम्हाला मुक्ती मिळवून देतो असे सांगून तो लोकांकडून बकऱ्याचे काळीज, लिंबू, राख आदी मागवत असायचा. रिदम हा मालाड पूर्व येथे राहतो. पूर्वी जिम ट्रेनर होता. काही महिन्यांपासून तो मालाड पूर्व येथील मैदानात दरबार भरवत होता.
नेस्को ड्रग प्रकरणी सातवी अटक
नेस्को प्रदर्शन केंद्रातील ड्रग पार्टी प्रकरणी आणखी एकाला वनराई पोलिसांनी अटक केली. विनीत गरलानी असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने अटक आरोपींची संख्या सात झाली आहे. तो दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयात शिकतो. गेल्या आठवडय़ात नेस्को प्रदर्शन केंद्रात पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत ड्रगच्या ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल वनराई पोलिसांनी घेतली. वनराई पोलिसांनी कारवाई करून सहा जणांना अटक केली होती. अटक असलेल्या आरोपींच्या चौकशीत विनीतचे नाव समोर आले.
ड्रग्ज तस्कर महिलेसह तिघांना अटक
एमडी ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी एका महिलेसह तिघांना खार पोलिसांनी अटक केली. आरिफ मोहम्मद इलियास शेख, रिझवान लियाकत अली आणि नाजनीन आरिफ शेख अशी या तिघांची नावे आहेत. आरिफ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात 15 हून अधिक गुन्हे नोंद आहेत.
गेल्या महिन्यात एक जण खार येथे ड्रग विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या पथकातील उप निरीक्षक हनुमंत कुंभारे आदी पथकाने सापळा रचून आरिफच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 15 ग्रॅम एम डी ड्रग जप्त केले. या गुह्यात पोलिसांनी त्याची पत्नी नाजनीन आणि रिझवानला अटक केली. आरिफ हा सांताक्रुझ येथे राहत होता. त्याने अंधेरी येथे एक रूम भाडय़ाने घेतली होती. ड्रगचे पैसे हे नाजनीनच्या बँक खात्यात जमा होत होते.



























































