
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने ‘सुपर डुपर’ हीट ठरला आहे. या चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर चार आठवडे पूर्ण केले आहेत. २८ दिवसांनंतर या चित्रपटाची देशातील निव्वळ कमाई १,०९९.७२ कोटी रुपये झाली आहे. तर एकूण कमाई १,३१६.४५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मात्र असे असले तरी ‘पुष्पा २’ झुकेगा नहीं म्हणत अजूनही पहिले स्थान टिकवून आहे.
परदेशातील कमाईवर नजर टाकल्यास या चित्रपटाने २८ व्या दिवशी ०.५० कोटी रुपये कमावले, ज्यामुळे आता परदेशातील एकूण कमाई आतापर्यंत ४१६.७५ कोटी रुपये झाली आहे. ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई १,७३३.२० कोटी रुपये झाली आहे.
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा विक्रम मोडण्यासाठी रणवीर सिंगच्या चित्रपटाला अजूनही १३५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ‘पुष्पा २’ची हिंदुस्थानातील निव्वळ कमाई १,२३४.१० कोटी रुपये आहे. त्यामुळे आतापर्यंतचा हिंदुस्थानातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून पुष्पा २ आपल्या स्थानावर कायम आहे.
बॉक्स ऑफिसच्या कमाईवर नजर टाकल्यास स्पष्ट होते की, चौथ्या बुधवारी या चित्रपटाने देशात तिकीट खिडकीवर ४.०५ कोटी रुपये कमावले. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ६७४.१७ कोटी रुपयांची मोठी कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात कमाईत मोठी घट झाली आणि अवघे २६३.६५ कोटी रुपये जमा झाले. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने ११०.६० कोटी रुपये कमावले.
या आधी १८ मार्च रोजी झालेल्या ‘पेड प्रिव्ह्यू’मधून या चित्रपटाने ४३ कोटी रुपये कमावले होते. आता ‘धुरंदर २’ आणखी १३५ कोटी रुपये कमावून बॉक्स ऑफिसवरचा धुरंदर बनून पुष्पा २ ला झुकवणार का याकडे सिने रसिकांचे लक्षं लागलं आहे.





























































