सामना अग्रलेख – मोदींचा भाव कोसळला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदींच्या घरातल्या लोकप्रियतेला घसरण लागल्यामुळेच त्यांच्या जागतिक लोकप्रियतेला घरघर लागली आहे. मोदी यांची ध्येयधोरणे फसवी ठरली. शेजारी राष्ट्रांशी भारताचे संबंध साफ बिघडले आहेत. प्रत्येक गोष्टीत भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान करून लोकांना तणावात ठेवायचे. यामुळे जगात प्रतिष्ठा मिळते या भ्रमातून मोदींनी बाहेर पडायला हवे. देशातील तरुण नेतृत्व, विरोधी पक्षांना खतम करून स्वतःला मजबूत साबीत करण्याचा डाव त्यांच्यावर उलटला आहे. ‘मोदी मॅजिक’ ही निव्वळ एक हातचलाखी होती. मोदी यांनी जागतिक मंचावर विशेष काय कामगिरी केली? कुणाकडे काही लेखाजोखा असेल तर द्यावा. ‘Time 100’ मधून भारताच्या पंतप्रधानांनी गायब होणे ही मोदींच्या पतनाची सुरुवात आहे. जगाला जे कळले ते देशाला कधी कळणार?

पंतप्रधान मोदी यांच्या अंध भगतगणांसाठी एक ‘बॅड न्यूज’ आहे. ‘टाइम’ मॅगझिनने 2026 सालातील जागतिक प्रभावशाली लोकांची यादी जाहीर केली. त्यात पंतप्रधान मोदींचे नाव कोठेच दिसत नाही. अभिनेता रणबीर कपूर, इंटरनॅशनल ‘बावर्ची’ विकास खन्ना हे त्या प्रभावी लोकांच्या यादीत आहेत. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह, बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहेमान हे प्रभावशाली व्यक्ती म्हणून ‘टाइम’च्या ‘पॉवर’ यादीत झळकले, पण विश्वगुरूंची हवा या वेळी पूर्णपणे गेलेली दिसते. यादीमध्ये डोनाल्ड ट्रम्प, चीनचे शी जिनपिंग, इस्रायलचे बेंजामीन नेतान्याहू आहेत. नेपाळ, बांगलादेशात राजकीय क्रांती घडवणारे दोन तरुण नेते आहेत. अर्थात अंधभक्त म्हणतील, मोदींचे नाव आले नाही त्यात काय मोठे! ‘टाइम’च्या पॉवर लिस्टवर जग चालत नाही. त्यांचे हे म्हणणे खरेच आहे, पण याआधी मोदींनी 2014 ते 2021 पर्यंत पाच वेळा ‘Time 100’ मध्ये जगातील प्रभावशाली नेते म्हणून स्थान मिळवले तेव्हा अंधभक्त महामंडळाने भारतात विश्वगुरूंचा उत्सव साजरा केला होता. त्यामुळे नेपाळ, बांगलादेशच्या पंतप्रधानांइतकीही पत मोदींची या वेळी राहिली नाही काय, असा प्रश्न पडू शकतो. 24 तासांपूर्वीच प्रे. ट्रम्प यांनी मोदींना फोन करून चर्चा केल्याची माहिती स्वतः मोदी यांनीच दिली, पण पुढच्या 12 तासांत भारतास रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असे फर्मान अमेरिकेतून सुटले व भारताने ते मान्य केले. हे काही क्रांतिकारी नेतृत्वाचे लक्षण नाही. एक काळ असा होताच की, Time मॅगझिनचे कव्हर त्यांच्या नावाने सजायचे. तेव्हा ट्रम्प, पुतीन यांच्यापेक्षा आपलीच ‘पॉवर’ जास्त अशा थाटात मोदी जगभम्रणाला निघत. आता मोदी शंभर प्रभावशाली लोकांत नसतील याचा अर्थ ते

जागतिक राजकारणात कमजोर

ठरत आहेत. त्यांच्या ढासळलेल्या भूमिकांचे हे प्रतिबिंब आहे. भारताची अर्थव्यवस्था कोसळून सहाव्या क्रमांकावर गेली. रुपया डॉलर्सच्या तुलनेत 94-95 पर्यंत पडला. मोदींची विदेश नीती केवळ फोटो, सोशल मीडिया व सभांतील भाषणांपुरती उरली. इराण-इस्रायल, अमेरिकेच्या युद्धात कंगाल पाकिस्तानला भलतेच महत्त्व मिळाले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल मुनीर शांती चर्चेसाठी तेहरानला उतरले. इस्लामाबादेत शांती वार्ता झाली, पण या सगळ्या घडामोडीत भारत कोठेच दिसला नाही. मोदी हे फार मोठे जागतिक, मुत्सद्दी कधीच नव्हते. अमेरिकेत ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यावर भारतावर ‘टॅरिफ’चा वरवंटा पडला. चीनशी आपले संबंध आजही तणावाचेच राहिले. QUAD आणि BRICS मध्येही भारताच्या भूमिकेला तसे महत्त्व उरलेले नाही. कारण अशा जागतिक सोहळ्यात मोदी balancing act… म्हणत डोंबाऱ्याचाच खेळ करताना दिसतात. कोणतीही भूमिका घेत नाहीत. ते एखाद्या व्यापाऱ्यासारखे वागतात व भारतातील आपल्या उद्योगपती मित्रांना जागतिक मंचावर फायदा मिळेल एवढेच पाहतात. जेव्हा पाश्चिमात्य देश, पाकिस्तान, श्रीलंकेसारखी शेजारी राष्ट्रे इस्रायल-इराण संघर्षात भूमिका वठवत होती तेव्हा मोदी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत प्रचाराचे डमरू वाजवत फिरत होते. ‘सब का साथ, सब का विकास’ ही मोदींची थिअरी जागतिक राजकारणात फेल ठरली. ‘Time 100’ सारख्या यादीतून मोदी गायब होणे हा योगायोग नाही. जग आता मोदींना भाव देत नाही. मोदींकडे कोणतेही व्हिजन नाही. देशांतर्गत राजकारणात अनेक चालबाज्या करून

सत्तेला चिकटलेले नेते

म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मोदी यांच्या काळात देश धर्मांधता व कट्टरवादाकडे झुकला. लोकशाही संस्थांचे पतन झाले. त्यांचा हिंदुत्वाचा ढोंगी अजेंडा मानवी हक्कास मारक असल्याची चर्चा जगात आहे. पत्रकारिता व न्यायालयांवर दबाव आहे व अल्पसंख्याक दहशतीखाली आहेत. हे सगळे पाश्चिमात्य मीडियात आणि थिंक टँकस्मध्ये भारताला ‘इलेक्टोरल-ऑटोक्रसी’ म्हणून रंगवतात. भारतात मोदींचा एकछत्री अंमल सुरू आहे. त्यादृष्टीने ते शक्तिशाली आहेत. देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्ती शक्तिशाली असणे यात नवल काय! कधीकाळी देवेगौडा हेसुद्धा पंतप्रधान म्हणून प्रभावशाली होतेच. त्यामुळे मोदी भारतात प्रभावशाली आहेत याचे कौतुक कसले! मोदींच्या घरातल्या लोकप्रियतेला घसरण लागल्यामुळेच त्यांच्या जागतिक लोकप्रियतेला घरघर लागली आहे. मोदी यांची ध्येयधोरणे फसवी ठरली. ‘व्होकल फॉर लोकल’च्या नावाखाली अर्थव्यवस्था मजबूत करण्याऐवजी जागतिक व्यापार युद्धात भारत अडकला. शेजारी राष्ट्रांशी भारताचे संबंध साफ बिघडले आहेत. अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई हे विषय देशात पेटले आहेत. प्रत्येक गोष्टीत भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान करून लोकांना तणावात ठेवायचे. यामुळे जगात प्रतिष्ठा मिळते या भ्रमातून मोदींनी बाहेर पडायला हवे. देशातील तरुण नेतृत्व, विरोधी पक्षांना खतम करून स्वतःला मजबूत साबीत करण्याचा डाव त्यांच्यावर उलटला आहे. ‘मोदी मॅजिक’ ही निव्वळ एक हातचलाखी होती. मोदी यांनी जागतिक मंचावर विशेष काय कामगिरी केली? कुणाकडे काही लेखाजोखा असेल तर द्यावा. ‘Time 100’ मधून भारताच्या पंतप्रधानांनी गायब होणे ही मोदींच्या पतनाची सुरुवात आहे. जगाला जे कळले ते देशाला कधी कळणार?