प्रासंगिक – अक्षय्य तृतीया ः महत्त्व आणि पार्श्वभूमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< वृषाली पंढरी

हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. 2026 मध्ये अक्षय्य तृतीया रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. ही तिथी 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.49 मिनिटांनी सुरू होत असून तृतीया तिथी समाप्ती 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी होईल. ही तिथी स्वतः अबूझ अर्थात या दिवशी कोणतेही शुभकार्य मुहूर्त न बघता करता येते अशी मानली जाते.

या दिवशी लग्न, घरकाम, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणे, व्यवसाय सुरू करणे असे उपक्रम मुहूर्त न पाहता करता येतात. धार्मिक मान्यतेनुसार सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुरू झाले. विविध कारणांनी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा दिवस खूपच शुभ मानला जातो. या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. असे मानले जाते की, या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात सुख-समृद्धी आणतात आणि संपत्तीत वाढ होत राहते. थोडक्यात या दिवशी केलेल्या शुभकार्याचे समाधान, फल क्षय न होणारे असते असे मानले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला विशेष महत्त्व आहे. आहेरेवाल्यांनी नाहीरेवाल्यांना मदत करणे हा दान देण्यामागचा हेतू आहे. ‘दान’ म्हणजे हल्लीचे डोनेशन नव्हे. डोनेशन देताना देणाऱ्याचे नाव, गाव आणि किती डोनेट केले आहे ते जाहीर केले जाते. एवढेच नव्हे, काही वेळा तर तसा फलकही लावला जातो. खरे तर दान सत्पात्री आणि गुप्त असावे. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये, असे त्यामुळेच म्हटले जाते. दान दिल्याने याच जन्मात समाधानाचे, कृतार्थतेचे पुण्य मिळते.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने या दिवसापासून नियमित अर्थदान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, ग्रंथदान, वस्त्रदान करणारे असे काही संकल्प सोडायला हवे. नेत्रदान, अवयवदान असे संकल्प तर फारच महत्त्वपूर्ण ठरावेत.

महाराष्ट्रात या दिवशी पितृतर्पण केले जाते. गव्हाच्या पिठाची खीर आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सोने खरेदी (गोल्ड खरेदी) करणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. पायसम ही दक्षिण भारतीय पद्धतीची तांदूळ, दूध आणि गुळापासून बनवलेली पौष्टिक खीर आहे. अक्षय्य तृतीयेपासूनच ओडिशामध्ये ‘अक्षय मुठी’ नावाने शेतकरी भात पेरणीला सुरुवात करतात. या दिवशी ‘नंदनकानन’मध्ये चंदनोत्सव सुरू होतो. राजस्थानात आणि उत्तर भारतातील काही राज्यांत या दिवशी ‘आखा तीज’ साजरी केली जाते. या दिवशी शहरात पतंगबाजी केली जाते. राजस्थानी घरांमध्ये या दिवशी ‘खेचडा’ नावाचा पदार्थ बनवला जातो, तसेच बालविवाह रोखण्यासाठी या दिवसाला प्रशासकीय महत्त्वही आहे. आंध्र, तामीळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये हा दिवस भगवान विष्णू आणि लक्ष्मीपूजेसाठी महत्त्वाचा आहे. जैन धर्मात हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान आदिनाथ यांनी वर्षभराचा उपवास (तप) इक्षुरस (उसाचा रस) पिऊन सोडला होता म्हणून हा दिवस विशेष मानला जातो.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आपण चांगल्या कार्याचा प्रारंभ करू या. सण-उत्सवांचा मूळ उद्देश शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले ठेवणे, संस्कृती आणि परंपरा जपणे हाच आहे. या अक्षय्य तृतीयेपासून समाजातील गरीब व गरजू लोकांना मदत करण्याची आपण सवय लावून घेऊ यात. त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीही मदत करू.