कोयंबतूरमध्ये टुरिस्ट व्हॅन दरीत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूच्या कोयंबतूर जिल्ह्यात पर्यटकांची व्हॅन दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. वलपराई टेकड्यांजवळ हा अपघात झाला. जखमींमध्ये व्हॅन चालकाचा समावेश आहे.

एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातून 13 जणांना घेऊन जाणारी टुरिस्ट व्हॅन वलपराई-पोल्लाची डोंगराळ रस्त्यावरून खाली उतरत असताना अनियंत्रित झाली. यानंतर व्हॅनने 13व्या हेअरपिन वळणावर बॅरियरला धडक दिली आणि त्यानंतर खोल दरीत कोसळली. व्हॅनचा चक्काचूर झाला.

या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोल्लाची येथील सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील काही मयत हे मलप्पुरम येथील एका शाळेतील शिक्षक होते. हे सर्वजण वालपराईला सहलीवर गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी पोल्लाची येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.