चिप्सच्या पाकिटात आढळले किडे, बाजारातील पॅकेट खाद्यपदार्थांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून एक अशी घटना उघडकीस आली आहे, यामुळे पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नादौनमधील गौना गावातील ही घटना असन, चिप्सच्या सीलबंद पाकिटात जिवंत किडे असल्याचे निदर्शनास आले. हे पॅकेट दोन वर्षांच्या मुलासाठी खरेदी करण्यात आले होते. पॅकेट उघडल्यावर कुटुंबाला धक्का बसला.

टीव्ही 9 ने दिलेल्या माहितीनुसार, गौना गावातील रहिवासी सोनी कुमार यांनी चिप्सचे हे पॅकेट खरेदी केले होते. पॅकेट बाहेरून पूर्णपणे सीलबंद होते. पॅकेटवरील माहितीनुसार, पॅकेजिंगवर १९ मार्च २०२६ ही तारीख होती आणि त्याची मुदत १७ जुलै २०२६ रोजी संपणार होती. परंतु कुटुंबाने मुलाला चिप्स देण्यासाठी पॅकेट उघडले, तेव्हा ते थक्क झाले. चिप्समध्ये असंख्य लहान किडे सरपटताना दिसत होते. किडे पाहिल्यानंतर घरातील सर्वजण घाबरले. घडलेल्या या घटनेनंतर, झालेल्या प्रकाराची परिसरात चर्चा सुरू झालेली आहे. एका सीलबंद पॅकेटमध्ये अशा पद्धतीने निष्काळजीपणा होऊ शकतो, तर बाजारात विकले जाणारे इतर खाद्यपदार्थ किती सुरक्षित असतील? असा प्रश्न आता गावातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

या घटनेनंतर कुटुंबाने दुकानदाराशी संपर्क साधला. दुकानदाराने याबाबत म्हटले की, त्याला कंपनीकडून हा माल फक्त दोन दिवसांपूर्वीच मिळाला होता. त्याने कंपनीला या प्रकरणाची माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे. या संपूर्ण घटनेमुळे पॅकेजिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी शिवराम राही यांनी सांगितले की, हे प्रकरण गंभीरतेने घेऊन जिल्हाभरातील दुकानांची तपासणी केली जाईल. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित दुकानदार व कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल.