तेलंगणाच्या निर्मितीची तुलना हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीशी, भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांच्या विधानाने वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेतील विशेष अधिवेशनादरम्यान भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांच्या वक्तव्यामुळे तेलंगणात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. सुर्या यांनी आंध्र प्रदेशाचे विभाजन आणि तेलंगणा राज्याच्या निर्मितीची तुलना हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीशी केल्याने काँग्रेस आणि बीआरएसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या तुलनेवर असंवेदनशील आणि ऐतिहासिकदृष्ट्या चुकीची असल्याची टीका होत आहे.

तेलंगणा राज्याच्या निर्मितीला भावनिक आणि राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याने या विधानावर आक्षेप घेत तेलंगणाचे मंत्री पूनम प्रभाकर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी सुर्या यांच्या वक्तव्याची नोंद संसदीय नोंदीतून वगळण्याची मागणी केली असून, हे वक्तव्य “असंवेदनशील आणि वस्तुस्थितीला धरून नसलेले” असल्याचे म्हटले आहे. तसेच संबंधित खासदाराने माफी मागावी आणि संसदीय शिष्टाचार राखण्यासाठी योग्य कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, बीआरएसचे कार्याध्यक्ष के.टी. रामाराव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “तेलंगणाची निर्मिती ही लोकशाही प्रक्रियेतून झालेली असून तिची तुलना देशाच्या फाळणीशी करणे म्हणजे अज्ञान आणि अहंकाराचे दर्शन आहे,” असे ते म्हणाले. तेलंगणा हे कोणत्याही दानातून नव्हे, तर दशकांतील संघर्ष आणि हजारो युवकांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आणि सुर्या तसेच भाजपने बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे.