अमेरिकेत पाच संशोधक बेपत्ता, …तर पाच जणांचा रहस्यमय मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत अणू आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मृत्यू आणि बेपत्ता होण्याच्या प्रकरणांवरून आता व्हाईट हाऊस प्रश्नांची सरबत्ती होत आहे. 2023 पासून अशा दहा घटना घडल्या आहेत. यामध्ये शास्त्रज्ञ किंवा अधिकारी बेपत्ता झाले किंवा संशयास्पद परिस्थितीत मरण पावले.

व्हाईट हाऊसच्या ब्रीफिंगमध्ये बुधवारी पहिल्यांदाच प्रेस सचिव पॅरोलिन लेविट यांना या घटनांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पॅरोलिन लेविट म्हणाल्या, ‘मी अद्याप संबंधित एजन्सींशी याबद्दल बोलले नाही. मी असे करेन आणि तुम्हाला उत्तर देईन.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘जर हे खरे असेल तर ही निश्चितपणे अशी बाब आहे ज्याची सरकार चौकशी करण्यायोग्य मानेल.’ पॅरोलिन लेविट यांच्या उत्तरावरून अमेरिकन नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनांना सरकारी एजन्सी गांभीर्याने घेत नाहीत किंवा ते लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका होत आहे.

शास्त्रज्ञ घरातून बाहेर पडले, पण…

शास्त्रज्ञांच्या बेपत्ता होण्याच्या किंवा मृत्यूच्या सर्व घटना अमेरिकेतील उच्च-सुरक्षित संशोधन संस्थांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये लॉस अलामोस नॅशनल लॅब, नासाची जेट प्रोपल्शन लॅब आणि एमआयटीचे प्लाझ्मा सायन्स अ‍ॅण्ड फ्युजन सेंटर यांचा समावेश आहे. या संस्था अणुबॉम्ब, प्रोपल्शन आणि नवीन ऊर्जा तंत्रज्ञानावर काम करतात. अहवालानुसार, अनेक बेपत्ता शास्त्रज्ञ अचानक त्यांच्या घरातून पायी बाहेर पडले. त्यांनी फोन, पाकीट आणि चाव्याही मागे सोडल्या. अनेक प्रकरणांमध्ये बेपत्ता होण्याचा हाच पॅटर्न आहे.