
पारसी जिमखाना आणि कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या संघांनी सलग दोन सामने जिंकून शिवाजी पार्क जिमखान्याने आयोजित विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई टी 20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुंबई क्रिकेट क्षेत्रात सर्वात प्रतिष्ठेच्या टी-20 स्पर्धेत डी.वाय. पाटील संघाने साहिल गोडे (77) आणि सुरज शिंदे (45) यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर 6 बाद 220 धावांचा डोंगर उभारला, पण पारसी जिमखान्याने सलामीवीर सुमैर झवेरी (46), हर्ष आघाव (ना. 57) आणि आयुष वर्तकच्या (42) घणाघाती फलंदाजीच्या जोरावर पाच विकेट आणि 4 चेंडू राखून सहज विजय मिळवून दिला. या विजयाच्या जोरावर पारसी जिमखान्याने उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच दुसऱ्या एका सामन्यात कर्नाटक स्पोर्टिंगने गौरीश जाधव (ना.78), तनुष कोटियन (38), मकरंद पाटील (32) आणि विश्वजीत जगदाळेच्या (ना. 30) जोरावर 5 बाद 209 अशी मजल मारली आणि त्यानंतर नॅशनल क्रिकेट क्लबचा डाव 118 धावांतच गुंडाळत दणदणीत विजयाची नोंद केली. या विजयामुळे कर्नाटक स्पोर्टिंग उपांत्य फेरीत पोहोचला आहे.





























































