Nuclear Dust अमेरिकेला युरेनियम देण्यास इराण तयार; ट्रम्प यांचा दावा, करार झाल्यास पाकिस्तानला भेट देणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणने युरेनियमचा साठा अमेरिकेला देण्यास संमती दिली असून दोन्ही देश शांतता कराराच्या ‘अगदी जवळ’ पोहोचले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘ते आम्हाला न्यूक्लियर डस्ट (nuclear dust) देण्यास तयार झाले आहेत’. अमेरिकेच्या मते अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या समृद्ध युरेनियमच्या साठ्याचा उल्लेख ट्रम्प यांनी ‘न्यूक्लियर डस्ट’ असा केला. दोन्ही देशांमध्ये करार होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगतानाच, अमेरिका आणि इराणमध्ये ‘वाटाघाटी’ सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जर हा करार झाला तर तेल पुरवठा सुरळीत होईल, होर्मुझची सामुद्रधुनी खुली होईल आणि सर्वकाही सुरळीत होईल, असेही ते म्हणाले. तसेच, जर या करारावर इस्लामाबादमध्ये स्वाक्षरी झाली, तर आपण पाकिस्तानचा दौरा करू शकतो, असे संकेतही या ट्रम्प यांनी दिले.

गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात २१ तास चाललेली मॅरेथॉन शांतता चर्चा निष्फळ ठरली होती. इराणने अणू इंधनावरील आपला हक्क सोडण्यास नकार दिल्याचा दावा करत वॉशिंग्टनने या करारावर स्वाक्षरी केली नव्हती. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी स्पष्ट केले होते की, जर इराणच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेबाबत अमेरिकेने आखून दिलेल्या ‘लक्ष्मणरेषेचे’ पालन झाले, तरच हा दोन्ही देशांसाठी एक उत्तम करार ठरू शकतो. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्यानुसार, वॉशिंग्टनने इराणच्या युरेनियम संवर्धनावर २० वर्षांच्या बंदीचा प्रस्ताव दिला होता, तर इराणने केवळ पाच वर्षांसाठी ही बंदी मान्य केली होती. सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाने इराणने देशांतर्गत युरेनियम संवर्धन कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी केली होती, कारण यामुळे अण्वस्त्र निर्मितीचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी अमेरिकेला भीती आहे. मात्र, आपला अणू कार्यक्रम केवळ शांततापूर्ण कारणांसाठी असल्याचे इराणने वेळोवेळी सांगितले आहे. तसेच आपण अण्वस्त्रांसाठी प्रयत्न करत नसल्याचेही इराण कायम स्पष्ट करत आला आहे.