
सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीनंतर खातेवाटप आणि विविध समित्यांवरील नियुक्त्या उद्या (दि. 17) होत आहेत. त्यामुळे स्थायी समितीसह बांधकाम, अर्थ, शिक्षण आणि आरोग्य समित्यांवर नियुक्ती करण्यासाठी सदस्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सभापती पृथ्वीराज पाटील आणि सावित्री रवि-पाटील यांना खातेवाटप होईल. याशिवाय विविध समित्यांवर सदस्यांच्या निवडी केल्या जातील. सत्ताधारी आघाडीचे नेते, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समित्यांची यादी फायनल करणार आहेत.
सांगली जिल्हा परिषदेतील विरोधी सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीला विशेष महत्त्व आहे. याशिवाय बांधकाम, अर्थ, आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, जलव्यवस्थापन व पाणीपुरवठा या समित्या आहेत. त्यामुळे या समित्यांवरील सदस्यत्व हे केवळ प्रतिष्ठेचे नसून, विकासकामांवर प्रभाव टाकणारे मानले जाते. सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये या नियुक्त्यांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. स्थायी समिती, बांधकाम, अर्थ, शिक्षण आणि आरोग्य समित्यांवर स्थान मिळवण्यासाठी सदस्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. जिल्हा परिषदेतील स्थायी समितीला धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत अत्यंत महत्त्व असल्यामुळे या समितीत स्थान मिळवण्यासाठी अनेक इच्छुक प्रयत्न करीत आहेत.
आघाडीचे प्रमुख नेते आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या उपस्थितीत समित्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील हे नेतेही या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावत आहेत. विविध गटांमध्ये समतोल राखत नियुक्त्या करण्याचे मोठे आव्हान नेतृत्वासमोर आहे.
उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या बैठकीत खातेवाटप आणि समित्यांची घोषणा झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पुढील कामकाजाचा मार्ग निश्चित होणार आहे. त्यामुळे इच्छुक सदस्यांची धावपळ आणि नेत्यांकडे सुरू असलेले लॉबिंग यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी काळात या नियुक्त्यांमुळे सत्ताधारी आघाडीतील समीकरणे स्पष्ट होणार असून, जिल्हा परिषदेतील कारभाराला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





























































