
हिंदुस्थानी बुद्धिबळ विश्वात नवा इतिहास रचत आर वैशाली हिने शांत स्वभाव, अढळ आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर फिडे महिला कँडिडेट्स शतरंज स्पर्धा जिंकली. या कामगिरीसह ती हा प्रतिष्ठेचा किताब जिंकणारी पहिली हिंदुस्थानी महिला ठरली आहे, हे विशेष.
भावाच्या सावलीतून स्वतःची ओळख
दीर्घकाळ ती आपला भाऊ आर प्रज्ञानंदाच्या यशाच्या छायेत राहिली. या स्पर्धेत प्रज्ञानंदाही सहभागी होता, पण तो लवकरच बाद झाला. मात्र, वैशालीने कोणताही दबाव न घेता स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रित केले आणि उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या या यशानंतर प्रज्ञानंदानेही तिचे कौतुक करत निर्णायक क्षणी दाखवलेल्या मानसिक ताकदीचे विशेष कौतुक केले. या स्पर्धेत अलेक्झांड्रा गोरियाचकिना, बिबिसारा असौबायेवा, झू जिनर आणि टॅन झोंगयी यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत वैशालीला फारसे दावेदार मानले जात नव्हते. हिंदुस्थानच्या दिव्या देशमुख हिलाही तिच्यापेक्षा वरचढ मानले जात होते. पण वैशालीने सर्व अंदाज खोटे ठरवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
खेळात शिस्त अन् साधेपणा!
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या वैशालीचे वडील बँक व्यवस्थापक होते, तर आई गृहिणी आहे. संपूर्ण कुटुंब बुद्धिबळाशी जोडलेले असल्याने शिस्त आणि साधेपणा तिच्या खेळातही दिसून येतो. डिसेंबर 2023 मध्ये ती कोनेरू हम्पी आणि डी हरिका यांच्यानंतर हिंदुस्थानची तिसरी महिला ग्रॅण्डमास्टर ठरली. यापूर्वी 2021 मध्ये इंटरनॅशनल मास्टर किताब जिंकत तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली होती. 2022 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तिने वैयक्तिक आणि संघ या दोन्ही गटांत कांस्यपदक जिंकले होते.
आता जागतिक किताबावर नजर
या विजयासह वैशाली आता चीनच्या विद्यमान विश्वविजेत्या जू वेनजुन हिला महिला विश्व बुद्धिबळ स्पर्धेत आव्हान देणार आहे. ‘हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे,’ अशी प्रतिक्रिया देताना तिने कठीण क्षणांत फोकस टिकवणे, हीच यशाची गुरुकिल्ली ठरल्याचे सांगितले.
आईचा आधार, आत्मविश्वासाची ताकद
शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखली जाणारी वैशाली अनेकदा आईसोबतच दिसते. आईची ही निःशब्द साथच तिला कठीण क्षणी स्थिर ठेवते. सायप्रसच्या पाफोस येथे झालेल्या या स्पर्धेत ती आठ खेळाडूंमध्ये सर्वात कमी रेटिंगची होती, मात्र आत्मविश्वासाच्या जोरावर तिने साऱ्यांना चकित केले. निर्णायक लढतीत तिने पॅटरिना लग्नो हिला पराभूत करत 8.5 गुणांसह किताब पटकावला.





























































