
राज्यासह सातारा जिल्ह्याततील रेशनकार्डधारकांसाठी राज्य सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. कडक उन्हाळा आणि काढत्या तापमानाची तीव्रता लक्षात घेता, प्रशासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एप्रिल महिन्यातच एकत्रित वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे आता लाभार्थ्यांना वारंवार रेशन दुकानांच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत.
सध्या सातारा जिल्ह्यात उन्हाचा कडाका 41 अंशांवर पोहोचला आहे. अशा कडक उन्हात वृद्ध, महिला आणि कष्टकरी वर्गाला रेशन घेण्यासाठी वारंवार रांगेत उभे राहावे लागत होते. आता या निर्णयामुळे नागरिकांची होणारी वणवण थांबणार असून, प्रशासकीय स्तरावरही धान्याचे वितरण सुलभ होणार आहे. शासनाच्या नियमानुसार, प्रती लाभार्थी ठरवून दिलेल्या प्रमाणात तांदूळ आणि गव्हाचे वितरण केले जाईल. जिल्ह्यासाठी या तीन महिन्यांच्या एकत्रित वितरणासाठी आवश्यक असणारे संपूर्ण नियोजन मंजूर करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर ते उपलब्ध होणार आहे.
या निर्णयामुळे सातारा जिल्ह्याततील पात्र लाभार्थ्यांना आता एप्रिल महिन्याच्या कोट्यासोबतच पुढील दोन महिन्यांचे धान्य आगाऊ मिळणार आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांच्या वेळेची आणि श्रमाची मोठी बचत होणार आहे. हा निर्णय अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटातील रेशनकार्ड धारकांसाठी लागू आहे. अत्यंत गरजू असलेल्या या कुटुंबांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय दिलासा देणारा ठरला आहे.
अंगठ्याच्या ठशाशिवाय रेशन नाही
धान्यकाटपामध्ये पूर्णपणे पारदर्शकता राहावी, यासाठी शासनाने ई-पॉस यंत्रणा अनिवार्य केली आहे. लाभार्थ्यांनी धान्य घेताना बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचा ठसा उमटवणे गरजेचे आहे. अंगठ्याच्या ठशाशिवाय रेशन मिळणार नाही, त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली ओळख पटवूनच धान्य घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.





























































