…अखेर वारकरी भाविकांची अग्निपरीक्षेतून सुटका, धूळखात पडलेल्या बॅटरीवरील कार धावू लागल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दैनिक ‘सामना’ने दणका देताच, मंदिर समिती व्यवस्थापनाला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली अन् धूळखात पडून असलेल्या बॅटरी कार भाविकांच्या सेवेत दाखल झाल्या. उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या अबालवृद्ध आणि अपंग भाविकांना या सेवेमुळे दिलासा मिळाला आहे.

पंढरपूरमधील उन्हाचा पारा 42 डिग्रीवर पोहोचला आहे. अशा तळपत्या उन्हात लाडक्या विठूमाउलीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची वर्दळ आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने पोलीस प्रशासनाने मंदिराकडे जाणारे प्रमुख मार्ग बॅरिकेड्स टाकून बंद केले आहेत. रुग्णवाहिका वगळता इतर कोणत्याही वाहनांना सहज प्रवेश दिला जात नाही. अगदी मंत्र्यांच्या गाड्यांनाही मंदिर परिसरात सोडले जात नाही. त्यामुळे भाविकांना आपली वाहने पार्किंगमध्ये लावून चालत यावे लागते.

या पायपीटमध्ये डोक्यावर आग ओकणारा सूर्य सोबत घेऊन अपंग, वयोवृद्ध, लहान मुलांना दर्शनरांगेचा मार्ग शोधावा लागतो. उन्हाळ्यामध्ये भाविकांची होणारी ही ससेहोलपट लक्षात घेऊन काही दानशूरांनी मंदिर समितीला बॅटरी कार भेट दिल्या आहेत. मात्र, भाविकांसाठीच्या या कार धूळखात पडून होत्या.

याबाबत दैनिक ‘सामना’ने व्यवस्थापनाचे कान टोचल्यानंतर समितीला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. या अनुषंगाने बातमी प्रसिद्ध होताच, 24 तासांच्या आतच पार्किंगमध्ये पडून असलेल्या बॅटरी कार मंदिर परिसरात धावू लागल्या आहेत. श्रीकृष्ण मंदिर ते नामदेव पायरी आणि महाद्वार चौक ते नामदेव पायरी अशी वाहतूक व्यवस्था सुरू झाल्याने कडक उन्हात भाविकांची अग्निपरीक्षेतून सुटका झाली आहे.

समितीने सेवासुविधांवर भर द्यावा

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरवरून भाविक पंढरीत येतात. या भाविकांना सेवा-सुविधा देण्याची जबाबदारी मंदिर समितीची आहे. इथे येणारा भाविकवर्ग हा सर्वसामान्य आहे. तो गैरसोयीबद्दल तक्रार करणार नाही. मात्र, समितीने मानवतेच्या दृष्टिकोनातून सुविधा द्यायला हव्यात. दै. ‘सामना’तून वृत्त प्रसिद्ध होताच बंद ठेवलेली कारसेवा सुरू झाली. बातमी लागली नसती तर वारकऱ्यांना अनवाणी पायांनी मंदिराकडे चालावे लागले असते, अशी भावना घोडनदी येथील भाविक बाबा शिरुरकर यांनी व्यक्त केली. कार नादुरुस्त होत्या, त्या दुरुस्त करून घेतल्या आहेत. त्या आजपासून मंदिर परिसरात सेवेत दाखल झाल्या आहेत. वाळवंटातून चालत येणाऱ्या भाविकांना सेवा देता येईल का, याबाबत संबंधित कार कंपनीशी बोलणी सुरू आहे. त्यांनी होकार दिला तर दोन कार जुना सोलापूर रोड ते महाद्वार घाट, पुंडलिक मंदिर अशी सेवा सुरू करता येईल. – प्रवीणकुमार घम, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर