
भाजप आमदाराच्या मुलाने चालवलेल्या एका एसयूव्हीने दिलेल्या धडकेत पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ७:३० च्या सुमारास करैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. भाजप आमदार प्रीतम लोधी यांचा मुलगा दिनेश लोधी याच्या ‘थार’ गाडीने एका मोटारसायकलला आणि रस्त्यावरून चालणाऱ्या दोन महिलांना धडक दिली. या अपघातात संजय परिहार, आशिष परिहार, अंशुल परिहार, सीता वर्मा आणि पूजा सोनी हे पाच जण जखमी झाले आहेत. तक्रारदार संजय परिहार यांनी सांगितले की, ते आशिष आणि अंशुलसोबत कामासाठी मोटारसायकलवरून थानरा गावाकडे जात होते. त्यावेळी समोरून चालणाऱ्या दोन महिलांना आणि त्यांच्या मोटारसायकलला मागून येणाऱ्या थारने जोराची धडक दिली.
वाटसरूंनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
जखमींनी दावा केला आहे की, दिनेश लोधी स्वतः गाडी चालवत होता आणि त्या गाडीच्या समोरच्या बाजूला ‘प्रीतम लोधी’ तर मागच्या बाजूला ‘MLA’ (आमदार) असे लिहिले होते. अपघातानंतर आरोपीने जखमींशी वाद घातला आणि त्यांना धमकावले, असाही आरोप करण्यात आला आहे.
जेव्हा एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपीने त्याला धमकीवजा भाषेत आक्षेप घेतला. रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये आमदाराचा मुलगा, ‘मी हॉर्न आणि सायरन वाजवत होतो, मग तुम्ही मध्ये का आलात?’ असा प्रश्न करताना ऐकू येत आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना आमदार प्रीतम लोधी यांनी कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी, असे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधीसाठी त्यांचा मुलगा किंवा कुटुंब जनतेपेक्षा मोठे नाही आणि पोलिसांनी पीडितांना न्याय मिळवून द्यावा. पोलिसांनी दिनेश लोधी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८१ आणि १२५(A) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.




























































