Air Pollution – आहार, झोप नव्हे तर वायु प्रदूषण आणि हवामानातील बदल ठरतोय मायग्रेनचे मुख्य कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांसाठी केवळ आहार किंवा झोपच नाही, तर आता हवेची गुणवत्ता देखील चिंतेचा विषय ठरत आहे. वाहनांचा धूर आणि औद्योगिक धुरामुळे होणारे वायू प्रदूषण हे मायग्रेनच्या तीव्र वेदना वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे एका अभ्यासात उघड झालं आहे.

‘न्यूरोलॉजी’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या संशोधनानुसार, दक्षिण इस्रायलमधील 7,000 हून अधिक लोकांवर 10 वर्षे केलेल्या या अभ्यासात असे दिसून आले की, ज्या दिवशी हवेतील नायट्रोजन डायऑक्साइड आणि सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढते, त्या दिवशी मायग्रेनच्या रुग्णांची संख्या अचानक वाढते. संशोधनानुसार, हवेतील प्रदूषके आणि हवामान यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. जेव्हा हवेत NO₂ चे प्रमाण अचानक वाढते, तेव्हा रुग्णांना तातडीने डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाण 41% पर्यंत वाढते. तसेच, प्रखर सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांमुळे हा धोका 23% ने वाढतो. विशेष म्हणजे, उष्ण आणि कोरड्या हवामानात वाहतुकीच्या प्रदूषणाचा प्रभाव अधिक तीव्र होतो, तर थंड आणि दमट हवामानात सूक्ष्म धूलिकणांमुळे मायग्रेनचा त्रास वाढतो, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

बेन्-गुरियन विद्यापीठाचे डॉ. इडो पेलेस यांनी सांगितले की, हवामान बदल आणि वाढत्या उष्णतेच्या लाटांमुळे भविष्यात मायग्रेनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. सतत प्रदूषणाच्या संपर्कात राहणाऱ्या लोकांमध्ये मायग्रेनच्या औषधांचा वापर 10% अधिक असल्याचेही आढळले आहे. त्यामुळे मायग्रेनच्या रुग्णांनी आता केवळ वैयक्तिक सवयींवरच नाही, तर बाहेरील हवेची गुणवत्ता आणि हवामानातील बदलांवरही लक्ष ठेवणे आवश्यक बनले आहे.