मुंबईत स्टुडियोला भीषण आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मालाड पश्चिम भागातील एका लोकप्रिय आउटडोअर शूटिंग लोकेशनवर शुक्रवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. माध-मरवे रोडवरील योगा आश्रमाजवळ असलेल्या ‘दाना पाणी भुल्लर गार्डन स्टुडिओ’मध्ये ही आग लागली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, सकाळी 6:13 वाजता आगीची माहिती मिळाली. तत्काळ मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस तसेच पी-नॉर्थ विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग प्रामुख्याने वायरिंग आणि इंस्टॉलेशन्समध्ये लागली होती. याशिवाय वॉलपेपर, फोम मॅट्रिक्स, कार्पेट, बांबू आणि लाकडी फर्निचर यांसारख्या ज्वलनशील वस्तूंमुळे आग आणखीन वाढली. या आगीत कार्यालयीन फर्निचर, कागदपत्रे, परफ्यूम, एअर कंडिशनिंग यंत्रणा आणि शूटिंगसाठी वापरले जाणाऱ्या उपकरणांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सुमारे 3,000 चौरस फूट परिसर या आगीत बाधित झाला असून पाच ते सहा गाळ्यांमध्ये ही आग पसरली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने चार फायर इंजिन, तीन जंबो टँकर, एक एरियल वॉटर टॉवर टेंडर आणि रुग्णवाहिका तैनात केल्या होत्या. सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी आणि अनेक स्टेशन अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईवर देखरेख ठेवत होते.

अखेर सकाळी 9:12 वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.