उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर केला विनोद, स्टँड-अप कॉमेडियनवर पोलिसांकडून कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशात उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांच्यावरील विनोदांमुळे आणखी एका स्टँड-अप कॉमेडियनवर पोलिसांची कारवाई झाली आहे. विशाखापट्टणमचा रहिवासी रफीक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याआधी हैदराबादमधील कॉमेडियन अनुदीप कतिकाला यालाही अशाच कारणावरून अटक करण्यात आली होती. The News Minute या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.

रफीकविरोधात कारवाई होण्यापूर्वी त्याची लोकेशन आणि संपर्क माहिती सोशल मीडियावर सार्वजनिक (डॉक्स) करण्यात आली होती. त्यानंतर मच्छलीपट्टणम येथील जनसेना नेते सयाना शिवन्नारायण यांनी चिलकलपुडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत रफीकने पवन कल्याण तसेच मंत्री नारा लोकेश यांच्याविरोधात “असभ्य आणि अवमानकारक वक्तव्य” केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी रफीकला 16 एप्रिलच्या रात्री विशाखापट्टणम येथील त्याच्या घरातून बोलावून विजाग आय टाउन पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर त्याला चिलकलपुडी येथे हलवण्यात आले. सध्या तो पोलीस कोठडीत असून, त्याची औपचारिक अटक अद्याप नोंदवण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या आठवडाभरात पवन कल्याण आणि त्यांच्या जनसेना पक्षाच्या समर्थकांनी अनुदीपविरोधात सोशल मीडियावर मोहीम चालवत धमक्या दिल्याचेही समोर आले आहे. अनुदीपच्या विनोदांमध्ये पवन कल्याण यांच्या वैयक्तिक आयुष्याचा तसेच अभिनेता राम चरण यांच्या विवाहाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर रफीकचेही काही व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात त्याने पवन कल्याण यांच्या संबंधांवर आणि 2019 च्या निवडणुकीतील पराभवावर भाष्य केले होते.

एका व्हिडिओमध्ये रफीकने पवन कल्याण यांना त्यांच्या पूर्व पत्नींसह विशाखापट्टणमच्या जनतेनेही “नाकारले” असे म्हटले होते. तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याने नारा लोकेश यांची तुलना ‘पोकेमॉन’ पात्राशी केली आणि हिंदुस्थान-रशिया संबंधांचा उल्लेख करत पवन कल्याण यांच्या रशियन पत्नी अॅना लेझनेव्हा यांच्याबाबत सूचक विनोद केला होता.

दरम्यान, अनुदीप कतिकाला प्रकरणात काकीनाडा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले होते. सुमारे 1000 किमी अंतर पार करत 14 एप्रिलला त्याला शोधून काढण्यात आले आणि 16 एप्रिलला काकीनाडा येथे आणण्यात आले. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केल्यावर त्याला वैयक्तिक हमीवर सोडण्यात आले.

अनुदीपने केलेल्या एका विनोदात अभिनेत्री निहारिका कोनिडेला यांच्या घटस्फोटाचा उल्लेख करत त्यांनी आपल्या काका पवन कल्याण यांच्याकडून सल्ला घ्यावा, असे म्हटले होते. यावर जनसेना समर्थकांनी आक्षेप घेत हा विनोद महिलांविषयी अपमानास्पद असल्याचा आरोप केला. मात्र, अनुदीपने यापूर्वी स्पष्ट केले होते की, घटस्फोटासंबंधी असलेला सामाजिक कलंक दूर करण्यासाठी तो हा विषय विनोदातून मांडत होता.