दुबईची शान आलिशान जुमेराह ‘बुर्ज अल अरब’ हाॅटेल राहणार १८ महिन्यांसाठी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक मानले जाणारे जुमेराह बुर्ज अल अरब आता काही काळासाठी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. दुबईची ओळख बनलेले हे प्रतिष्ठित हॉटेल, त्याच्या अद्वितीय डिझाइन आणि आलिशान सुविधांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हे हाॅटेल जगातील एकमेव ७ स्टार हाॅटेल आहे. परंतु आता नूतनीकरणासाठी हे हाॅटेल २०२७ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत, हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण आणि अंतर्गत सुधारणा केल्या जातील. हाॅटेलचे सौंदर्य आणि वारसा कायमस्वरूपी अबाधित राहावा, याकरता हे पाऊल उचलण्यात आले आहे.

जुमेराह बुर्ज अल अरब १९९९ मध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून ते दुबईचे एक महत्त्वाचे स्थान बनले आहे. या हॉटेलची खासियत ही त्याची अनोखी डिझाईन आहे. पारंपरिक बोटीच्या शिडासारखे हे डिझाईन जगभरातील पर्यटकांसाठी केंद्रबिंदू ठरलेले आहे. यामुळेच ते जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.

टाइम्स नाऊ नवभारतने दिलेल्या वृत्तानुसार, २०२७ पर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे मुख्य कारण नूतनीकरण हे आहे. हॉटेल व्यवस्थापनाच्या मते, हॉटेलची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे. अंदाजे १८ महिने चालणाऱ्या या प्रकल्पामध्ये इमारत आणि अंतर्गत सजावट या दोन्हींमध्ये सुधारणांचा समावेश असेल.

नूतनीकरणाचे काम हे फ्रेंच डिझायनर ट्रिस्टन ऑर यांच्यावर सोपवण्यात आलेले आहे. हॉटेलची अंतर्गत सजावट अधिक आकर्षक करणे हे नूतनीकरणामागील मुख्य उद्दीष्ट आहे.

जुमेराह बुर्ज अल अरबची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे हॉटेल समुद्रावर बांधलेले असून, येथे २१० मीटर उंचीवर एक हेलिपॅड आहे. हॉटेलच्या आत संगमरमर, सोन्याचा मुलामा आणि रंगीबेरंगी डिझाइनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. येथील ॲट्रियम जगातील सर्वात उंच ॲट्रियमपैकी एक आहे.