
जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी साहील शहनवाज अन्सारी (रा. मिल्लतनगर, जालना) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत आहेत. आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि संधी साधून तिला आपल्या घरी तसेच इतर ठिकाणी नेले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने महाविद्यालयातच बुरखा आणून दिला होता. पीडितेला हा बुरखा परिधान करायला लावून तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. ज्यावेळी घरी कोणीही नव्हते, त्या संधीचा फायदा घेत त्याने तरुणीवर अत्याचार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने कदीम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, डीवायएसपी अनंत कुलकर्णी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

























































