
कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अटीतटीचा सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरातने 5 विकेटने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने गुजरातला विजयासाठी 181 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने कडवी झुंज दिली. कर्णधार शुभमन गिलने (50 चेंडू 86 धावा) एकट्याने खिंड लढवत संघाला विजयाची दिशा दाखवली. अखेर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या शाहरुख खानने विजयी फटका मारत कोलकाताला पराभवाची धूळ चारली.


























































