
संसदेत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर चर्चा सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी नसून केवळ निवडणूक जिंकण्याचा एक राजकीय फॉर्म्युला असल्याची तोफ त्यांनी डागली. शताब्दी रॉय यांनी आपल्या भाषणात या विधेयकासोबत जोडलेल्या डीलिमिटेशन (लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना) आणि जनगणनेच्या अटींवरून गंभीर प्रश्न उपस्थित करत, 56 इंची छातीची भाषा करणाऱ्या सरकारला हे विधेयक लागू करण्यासाठी महिलांच्या आड का लपावे लागत आहे, असा रोखठोक सवाल केला.
महिलेला देवी, दुर्गा किंवा काली बनवण्यापेक्षा तिला केवळ एक ‘माणूस’ म्हणून सन्मान द्या आणि तिच्याशी माणुसकीने वागा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. सत्ताधारी पक्षातील अनेक खासदारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आणि महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांवर बोट ठेवत त्यांनी सरकारच्या सक्षमीकरणाच्या दाव्यांमधील फोलपणा उघड केला. ज्यांना खरोखर महिलांना अधिकार द्यायचे आहेत, त्यांनी आपल्या पुरुष खासदारांच्या जागा सोडून तिथे महिलांना संधी द्यावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.
ममता बॅनर्जी यांनी कोणत्याही कायद्याची किंवा आरक्षणाची वाट न पाहता पश्चिम बंगालमध्ये महिलांना 37 टक्के उमेदवारी देऊन सक्षमीकरण प्रत्यक्षात आणले आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 2011 ची जनगणना अद्याप पूर्ण नसताना 2047 च्या विकसित भारताचे स्वप्न दाखवणे ही जनतेची दिशाभूल असल्याचे सांगत, आगामी निवडणुकीत भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पुन्हा पराभव होईल, असा विश्वास शताब्दी रॉय यांनी व्यक्त केला.



























































