
चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने 42.6 अंशांचा उच्चांक गाठला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या कडक उन्हाचा परिणाम आता जंगलातील वन्यप्राण्यांवरही स्पष्टपणे दिसून येत आहे.
पाण्याच्या शोधात भटकंती करताना चंद्रपूर शहराच्या सीमेवरील वनउपज नाका जवळ हरणांची एक जोडी पाण्यासाठी भटकंती करत थेट मुख्य रस्त्यावर (हायवे) आल्याचे दृश्य समोर आले आहे. हरणाला रस्त्यावर बघता रस्त्यावरील वाहने थांबली. काही नागरिकांनी हरणाला जंगलात जाण्याचा मार्ग दाखवन्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर – मूल महामार्गावरील घटना असून हा जंगलमार्ग असल्याने अनेक वन्यप्राणी रस्त्यावर येतात. भरधाव वेगात ये – जा करणाऱ्या वाहनांमुळे अपघात होतात. वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील पाणवठे आटत चालल्याने वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्यासोबतच वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.






























































