
अमेरिकेचे माजी राजदूत रहम इम्यॅन्युएल यांनी हिंदुस्थान-अमेरिका संबंधांबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः हिंदुस्थान-पाकिस्तान संदर्भात ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे गेल्या तीन दशकांत निर्माण झालेली द्विपक्षीय मैत्री कमकुवत झाल्याचे त्यांनी म्हटले. नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
एका मुलाखतीत इमॅन्युएल म्हणाले की, हिंदुस्थान आणि अमेरिकेतील संबंध मजबूत करण्यासाठी सलग चार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दीर्घकाळ प्रयत्न केले होते. मात्र, ट्रम्प प्रशासनाने या प्रयत्नांना धक्का देत हिंदुस्थानकडे दुर्लक्ष केले आणि पाकिस्तानकडे झुकलेली भूमिका घेतली, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, ही भूमिका अमेरिकेच्या दीर्घकालीन धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहे.
इमॅन्युएल यांनी पुढे सांगितले की, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेचे पारंपरिक मित्र नाराज झाले आहेत. हिंदुस्थान, जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या महत्त्वाच्या सहयोगी देशांशी असलेले संबंध ताणले गेले असून, या देशांमध्ये अमेरिकेबद्दलचा विश्वास कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. या देशांना अमेरिकेशी असलेली जवळीक कमी होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

त्यांनी ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत म्हटले की, मित्रदेशांवर टॅरिफ लादणे, त्यांना धमक्या देणे आणि सार्वजनिकरित्या त्यांचा अपमान करणे ही धोरणे चुकीची आहेत. अशा वर्तनामुळे मित्रदेश दूर जातात आणि त्यानंतर त्यांचे समर्थन न मिळाल्यास तक्रार करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ट्रम्प यांच्या कार्यकाळात पाकिस्तानकडे कल वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबाबत ट्रम्प यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची वक्तव्ये हिंदुस्थानच्या भूमिकेच्या विरोधात असल्याची टीका त्यांनी केली.

























































