
महिला आरक्षण विधेयक हे केवळ एक राजकीय षडयंत्र असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या घसरणीची ही आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची हवी तशी मोडतोड करून सर्व निवडणुका जिंकण्याचे भाजपचे मनसुबे संसदेत कोलमडून पडले आहेत, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे.
संजय राऊत यांनी भाजपच्या रणनीतीवर प्रहार करताना म्हटले की, केंद्र सरकारला मनमर्जीने लोकसभेच्या जागा तर वाढवता आल्या नाहीतच, पण आता त्यांना संविधानाची ताकद आणि स्वतःची खरी कुवत काय आहे याची जाणीव झाली असेल. सध्याचे पंतप्रधान पद हे केवळ 16 खासदारांच्या बहुमतावर टिकून आहे. जर हे 16 खासदार कमी झाले, तर मोदींना झोला घेऊन सत्तेतून बाहेर पडावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.
महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते,ते कोसळले!
मोदी आणि त्यांच्या मंडळाच्या घसरणीची ही सुरुवात आहे
मतदार संघांची हवी तशी मोडतोड करून त्याना सर्व निवडणुका जिंकायच्या होत्या,(महिला आरक्षण नावाखाली)
ते मनसुबे संसदेत कोलमडून पडले!मनमर्जीने लोकसभेच्या जागा तर वाढवू शकले… pic.twitter.com/lv5MfVmmNr
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 17, 2026
आजच्या राजकीय घडामोडींचा अर्थ स्पष्ट करताना संजय राऊत पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी ’16 चा फास’ फेकला असून आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. “मोदी लवकरच सत्तेतून जात आहेत, हे तुम्ही लिहून ठेवा; फक्त थोडा वेळ थांबा आणि वाट पहा,” अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या पराभवाचे भाकीत वर्तवले आहे.


























































