
मध्य रेल्वे मार्गावर प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी सकाळी 10पर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळातील अप व डाऊन दिशेने जाणाऱया अनेक लोकलची सेवा कुर्ला, ठाणे, कल्याण अशा विविध स्थानकांवर समाप्त केली जाणार आहे. शनिवारी रात्री ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-खोपोली लोकल असेल. ही लोकल रात्री 10.28 वाजता सीएसएमटी येथून सुटेल. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 आणि डोंबिवली येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1ए, 1 आणि 2च्या अप-डाउन धिम्या मार्गाच्या विस्तारासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 10पर्यंत मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली अप-डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक असेल.


























































