राजकीय नेते, अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांचे खरात कनेक्शन; ईडी,आयकर तपासणीत धक्कादायक माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदू अशोक खरातच्या मालमत्तांची व संपूर्ण आर्थिक व्यवहारांची ईडी आणि आयकर खात्याकडून सखोल चौकशी केली जात आहे. कागदपत्रांसह काही स्टॅम्पपेपरवरील व्यवहार आणि नोंदी मिळून आल्याने त्याच्याशी संबंधित राजकीय नेते, अधिकाऱ्यांच्या आर्थिक संबंधांचे ‘गूढ’ असण्याची चर्चा आहे.

दोन दिवसांपूर्वी ईडीच्या पथकाने सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील शिवनिका ट्रस्टजवळील खरातचा आलिशान फार्म हाऊस, नाशिकमधील निवासस्थान, शिर्डीतील समता पतसंस्था, सिन्नरमधील जगदंबा पतसंस्था, तसेच पुण्यासह अन्य ठिकाणच्या मालमत्तांची तपासणी केली. मालमत्तेचे हजारो दस्तऐवज, साठेखत, कच्च्या व्यवहाराच्या व मालमत्तांच्या नोंदी, कोडवर्डमधील नोंदी या पथकाच्या हाती लागल्या आहेत.

ईडी पथकाने शुक्रवारी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात दिवसभर झडतीसत्र राबविले, तेथूनही आक्षेपार्ह माहिती मिळविली. शिवनिका ट्रस्टवरील विद्यमान व माजी विश्वस्त, तेथे सतत येणारे व खरातच्या सतत संपर्कात असणारे राजकीय नेते, त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, जवळचे वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक यांच्याशी मालमत्तेचे व्यवहार झाले असावेत, आर्थिक व्यवहार झाले असावेत, अशी शंका ईडीला आहे. याच दिशेने आयकर खात्याकडूनही तपासणी सुरू आहे. दरम्यान, नामी-बेनामी मालमत्तांसाठी खरातच्या माध्यमातून मनी लॉण्डरिंग झाल्याचे समोर येत आहे.