
युद्धबंदीदरम्यान इराणने एक मोठी घोषणा केली आहे. कच्च्या तेलासह जागतिक व्यापारासाठी अतिशय महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला करण्याचे इराणने जाहीर केले आहे. सर्व व्यापारी जहाजांना विनाअडथळा आणि सुरक्षित प्रवासाची परवानगी देण्यात येईल, मात्र युद्धबंदीच्या कालावधीपुरतीच ही परवानगी असेल, असे इराणने स्पष्ट केले. इराणच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अली अराघची यांनी यासंदर्भात सोशल मीडिया ‘एक्स’वर पोस्टद्वारे माहिती दिली. लेबनॉनमध्ये युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर इराणने हा निर्णय घेतल्याचे अराघची यांनी सांगितले. इराणच्या ‘पोर्ट्स ऑफ मेरिटाईम’ संस्थेने नियोजित केलेल्या मार्गाद्वारे सर्व जहाजांची वाहतूक होईल. यामुळे जहाजांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे अराघची यांनी स्पष्ट केले.
लवकरच पुन्हा चर्चा होणार
इराणने शांतता चर्चेसाठी ठेवलेल्या अटींमध्ये लेबनॉनमध्ये युद्धबंदीची इराणची एक प्रमुख अट होती. पाकिस्तानात झालेली चर्चा निष्फळ होण्यामागे या अटीची पूर्तता न होणे हे एक कारण होते. आता लेबनॉनमध्ये युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर लवकरच पाकिस्तानात चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराणचे आभार, मात्र नाकेबंदी सुरूच राहणार – ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबद्दल आभार मानले आहेत. मात्र होर्मुझचा मार्ग उघडला असला तरीही इराणवर अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी कायम राहील आणि ती केवळ इराणवरच लागू राहील, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
युरेनियम साठा सोपविण्यासाठी इराण सहमत; ट्रम्प यांचा दावा
इराणने समृद्ध युरेनियमचा साठा अमेरिकेला सोपवण्याची तयारी दर्शविल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन्ही देश शांतता कराराच्या खूप जवळ आहेत. करार झाल्यास कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होईल आणि परिस्थिती पूर्ववत होईल. करार इस्लामाबादमध्ये झाल्यास मी पाकिस्तानातही जाऊ शकतो, असे ट्रम्प म्हणाले.
इराणने होर्मुझचा मार्ग उघडण्याची घोषणा करताच कच्च्या तेलाचे दर मोठय़ा प्रमाणात कोसळले. 94 ते 95 डॉलर प्रतिबॅरलच्या आसपास असलेले दर थेट 11 ते 12 टक्क्यांनी कोसळले. त्यानंतर कच्च्या तेलाचे दर 83.29 डॉलरपर्यंत आले.




























































