
येत्या काही वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी म्हाडाने मास्टर प्लॅन तयार केला आहे. अभ्युदय नगर, कामाठीपुरा, मोतीलाल नगर, वांद्रे रिक्लेमेशन अशा मुंबईतील 923 एकर जागेवरील 12 प्रकल्पांचा समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे. बांधकाम व विकास संस्थेतर्फे (सी अॅण्ड डीए) होणाऱया या समूह पुनर्विकासाद्वारे पुढील पाच ते दहा वर्षांत 75,445 रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे.
गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरचा पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनचे अनावरण ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, येत्या काळात मुंबईतील समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळणार आहे. अभ्युदय नगर, जीटीबी नगर, पीएमजीपी अंधेरी, आदर्श नगर, वांद्रे रिक्लेमेशन, मोतीलाल नगर, कामाठीपुरा, सरदार वल्लभभाई पटेल नगर, वर्सोवा यापैकी काही प्रकल्प राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, काही प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. खार येथील रामकृष्ण नगर, बोरिवलीतील जुनी एमएचबी कॉलनी, चारकोप आणि गोराईच्या समूह पुनर्विकासासाठी लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. मुंबईच्या आणि म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शहरात ‘सी अॅण्ड डीए’च्या माध्यमातून समूह पुनर्विकास होणार आहे.
2400 चौ. फूट घराच्या मागणीवर मोतीलाल नगरवासीय ठाम
मोतीलाल नगरचा पुनर्विकास अदानी समुहाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पुनर्विकासात रहिवाशांना 1600 चौरस फूट कार्पेटचा फ्लॅट तर व्यावसायिकांना 987 चौरस फुटांचे दुकान देण्यात येणार आहेत. म्हाडाच्या या प्रस्तावाला रहिवाशांनी विरोध दर्शवला असून 2400 चौरस फूट कार्पेटचा फ्लॅट आणि 30 लाख रुपये कॉर्पस फंडची मागणी केली आहे.
प्रकल्प एकूण जागा
अभ्युदय नगर 33 एकर
जीटीबी नगर 11 एकर
पीएमजीपी कॉलनी, अंधेरी 7 एकर
आदर्श नगर, वरळी 34 एकर
वांद्रे रिक्लेमेशन 98 एकर
मोतीलाल नगर 143 एकर
कामाठीपुरा 34 एकर
एसव्हीपी नगर, वर्सोवा 74 एकर
रामकृष्ण नगर, खार 6 एकर
जुनी एमएचबी 26 एकर
चारकोप 250 एकर
गोराई 200 एकर





























































