
वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असताना दुसरीकडे महावितरणने अतिरिक्त सुरक्षा अनामत ठेव बिले पाठवून डोंबिवलीकरांना ‘शॉक’ दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांना किमान १०० रुपयांपासून ते तब्बल ५ हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याची नोटीस पाठवण्यात आल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
एमआयडीसी परिसरातील अनेक ग्राहकांना वीज बिलासोबत सुरक्षा ठेव बिले पाठवण्यात आल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत. आधीच एप्रिल-मे महिन्यात वाढलेल्या उष्णतेमुळे पंखे, कुलर आणि वातानुकूलीत यंत्रणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. परिणामी, वीज बिलही दुप्पट-तिप्पट येत असते. अशा परिस्थितीत अतिरिक्त अनामत रक्कम भरण्याचा भार नागरिकांच्या खांद्यावर पडत आहे. दरम्यान शहरातील तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीकडून पाणी बिलासोबत अशाच प्रकारची अतिरिक्त सुरक्षा ठेव वसूल करण्यात आली होती. आता महावितरणकडूनही अशाच पद्धतीने वसुली होत असल्याने भविष्यात महानगर गॅस कंपनी, बीएसएनएल यांसारख्या इतर सेवांकडूनही अशीच वसुली सुरू होण्याची भीती डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत.
आंदोलनाचा इशारा
महावितरण दरवर्षी अशा प्रकारे अतिरिक्त सुरक्षा ठेव देयकाच्या स्वरूपात कोट्यवधी रुपयांची वसुली करत आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांवर हा अतिरिक्त भार टाकणे अन्यायकारक आहे. महावितरणने सुरक्षा देयके मागे घेतली नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी विभागप्रमुख राजू नलावडे यांनी दिला आहे.





























































