
पालिकेच्या ‘बी’ विभाग अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि डोंगरी परिसरातील 9 अनधिकृत दुकाने, अनधिकृत वाहन पार्ंकगकरिता रस्त्यावर लावलेले लोखंडी खांब, दुकानांचे अनधिकृत नामफलक, इतर अतिक्रमणांवर पालिकेच्या ‘बी’ विभागाकडून बुलडोझर चालवण्यात आला.
‘बी’ विभागातील अनधिकृत दुकानांमुळे पादचाऱयांना चालण्यास अडथळा येत असल्याच्या पालिकेकडे तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेचे परिमंडळ 1 च्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. ‘बी’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन व अनुज्ञापन या विभागांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. यावेळी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही तोडकामाची कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान डोंगरी पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



























































