पक्षांतर्गत सुरू असलेला नरेंद्र मोदी वि.अमित शहा संघर्ष संसदेच्या पटलावर दिसला, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी है तो मुमकीन है, ही आता दंतकथा झाली आहे. फार फार तर आता नमकीन है, नमकीन नमकीन भाषणं करतात, आणि त्यांचीच लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच कालच्या विधेयकामुळे पक्षांतर्गत सुरू असलेला नरेंद्र मोदी वि. अमित शहा संघर्ष संसदेच्या पटलावर दिसला अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मोदी है तो मुमकीन है, ही आता दंतकथा झाली आहे. फारतर आता नमकीन है, नमकीम नमकीन भाषणं करतात, आणि त्यांचीच लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात. जे बिल अमित शहांनी आणलं ते बिल नरेंद्र मोदींना अपमानित करण्यासाठी आणलं की काय असा प्रश्न पडलाय. दोन तृतीयांश बहुमत आम्ही जमा करू शकत नही, भाजपकडे स्वतःचं बहुमत नाही, अशा वेळेला महिला आरक्षणाच्या भोंदू बिल लोकसभेत आणलं. त्यांचा मूळ उद्देश महिलांना हक्क देणं असा काही नव्हता. तर 543 वरून 850 जागा करण्याचा प्रयत्न होता आणि सत्तेचा अमरपट्टा कायम करून सतत विजय प्राप्त करायचा. याशिवाय अमित शहा यांचा कुठलाही हेतू नव्हता. बेकायदेशीरपणे विजय मिळवण्यासंदर्भात हे बिल होतं. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक बेकायदेशीर पद्धतीने विजय मिळवण्यासाठी त्या पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना करण्यासाठी महिलांच्या नावाखाली 850 जागा वाढवायच्या हे हेतूखेरीज या बिलाचा कोणताही हेतू नव्हता. या निमित्ताने देशात उत्तर वि. दक्षिण, महिला वि. पुरुष, असा संघर्ष पेटवायचा होता. या निमित्ताने त्यांना आम्हीच महिलांचे एकमेव तारणहार हा नॅरेटिव्ह सेट करायचा होता. जर ते खरोखरच महिलांचे तारणहार असतील तर 2023 साली जे महिला आरक्षण आम्ही सगळ्यांनी मंजूर केलं होतं त्यातल्या 543 जागांमध्ये नरेंद्र मोदी यांनी 33 टक्के आरक्षण द्यायला काहीच हरकत नव्हती. माननीय उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. पण ते न करता भाजपच्या पुरुष नेत्यांच्या जागा वाचवाव्यात यासाठी 850 जागा करण्याचे षडयंत्र होतं. ते संसदेतच लोकशाही मार्गाने उधळून लावायचं होतं. हे ढोंग आणि ही महिलांच्या नावावरती भोंदुगिरी, शोषण भाजप करत होतं, त्याचा आम्ही पर्दाफाश केला असेही संजय राऊत म्हणाले.

या विधेयकामुळे मोदी विरुद्ध अमित शहा असा पक्षांतर्गत चाललेला संघर्ष पहायला मिळाला. अमित शहा विरुद्ध नरेंद्र मोदी यांच्या संघर्षाबाबतीत बाहेर दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, ते लोकसभेच्या पटलावर आम्हाला पहायला मिळाला. महिला आरक्षणासंदर्भातलं विधेयक हे 2023 साली मंजूर झालेले आहे. तुम्ही 2023 च्या देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट बघा. तेव्हा फडणवीसांना मोदींचं अभिनंदन केलं होतं. स्वतः मोदींनी आनंद व्यक्त केला होता. आम्ही स्वतः 2023 ला आनंद व्यक्त केला होता. लोकशाहीचे रक्षण केल्याबद्दल काल आम्ही आनंद व्यक्त केला आहे असे संजय राऊत म्हणाले.

महिला आरक्षणाच्या नावाने जे ढोंग सुरू होतं, त्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि आमच्या सर्व विद्यमान खासदारांनी पाठिंबा दिला आणि आम्ही जिंकलो. आम्ही महिला आरक्षणाला विरोध केलेलाच नाही. कारण महिला आरक्षण हे आम्ही 2023 साली आम्ही मंजूर केलेले आहे असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

या विधेयकासाठी भाजप आंदोलन करणार आहेत, भाजपचे नेत मुर्ख आहेत. त्यांना फक्त ढोंगच करायचं होतं. ते निव्वळ भोंदू आणि ढोंगी आहेत. भाजपने या देशात अनेक भोंदू निर्माण केलेत, अनेक भोंदू पद्धतीच्या विचारांनी विधेयकं आणलीत कारण ते स्वतः भोंदू आहेत. काल एवढा मोठा पराभव झाल्यावर त्यांना गप्प बसायला पाहिजे होतं. भाजपने याबाबत आत्मचिंतन करायला पाहिजे होतं की आपण जनतेला, महिलांना फसवायला निघालो होतो, पण संसदेत त्यावर भाजपचा पराभव झाला. लोकशाही जिवंत आहे आणि जिवंत राहील असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.