
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावाजवळील नव्या पुलावर आज रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील ट्रकने समोरील वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून ट्रक थेट 15 फूट खाली विहिरीत कोसळला. ट्रक चालक ट्रकच्या केबीनमध्ये अडकून पडला होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
ट्रक (एमएच 06 बीडी 2555) लोखंडी साहित्य घेऊन पालीहून रत्नागिरीकडे जात होता. पहाटे पावणेपाचच्या सुमारास हातखंबा येथील पुलावर आल्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव ट्रकने प्रथम समोरील आयशर टेम्पोला (एमएच 07 एजे 9913) मागून जोरदार धडक दिली. या धडकेने आंब्याच्या पेट्या घेऊन वेंगुर्लाहून वाशीला निघालेला टेम्पो पलटी झाला. पलटी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या आयशर टेम्पोला (एमएच 05 ईएल 0227) धडकला. दरम्यान, अनियंत्रित झालेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या इर्टिगा कारलादेखील (एमएच 46 सीआर 9123) उजव्या बाजूने धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की अपघातग्रस्त ट्रक थेट पुलाच्या खाली सुमारे 15 फूट खोल विहिरीत कोसळला. या भीषण अपघातात ट्रक चालक विशाल माने (रा. धाराशीव) हा ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला होता.
जखमींना तत्काळ जगत्गुरू नरेंद्र महाराज अॅम्बुलन्सच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात घडताच हातखंबा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर अपघातातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे.




























































