

हंगेरीत भारताप्रमाणे ‘अमृत काल’ आल्याचा डंका पिटला जात होता, पण तो विषाचा प्याला होता. पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांची 16 वर्षांची भ्रष्ट, जुलमी राजवट तेथील जनतेने उलथवून टाकली. लोकशाही कधीच संपत नाही. लोकांनी झोपेतून जागे व्हावे लागते. भारताच्या व्हिक्टर ऑर्बन साहेबांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.
हंगेरीतील सत्तापरिवर्तनाशी भारतीय राज्यपद्धती व राजकारणाचा संबंध नाही.
हंगेरीची लोकसंख्या एक कोटीदेखील नाही. (एप्रिल 2026 पर्यंत 95 लाख 90 हजार.) त्यातील 80 लाख पात्र मतदारांपैकी 60 लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केले व 16 वर्षे सत्तेवर असलेले पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांचा दारुण पराभव केला. लोकशाहीने एका प्रबळ हुकूमशाहीला मतदानातून पराभूत केले. त्यांच्या पराभवाने फक्त युरोपीयन देशच नाहीत, संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले. व्हिक्टर ऑर्बन म्हणजे ‘शंभर नरेंद्र मोदी व अमित शहा’ होते, हे एवढेच वर्णन त्यांच्यासाठी पुरेसे म्हणता येईल. किंबहुना, भारतात सध्या जे सत्तेचे भ्रष्ट, पण अभेद्य मॉडेल सुरू आहे, ते बहुधा येथील लोकांनी हंगेरीच्या व्हिक्टर ऑर्बनकडूनच घेतलेले असावे. व्हिक्टर ऑर्बन हे प्रे. ट्रम्प यांचे पक्के समर्थक होते. त्यामुळे व्हिक्टर यांच्या प्रचारासाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स हे त्यांच्या सर्व ‘टीम’सह सहभागी झाले होते, पण हंगेरीत व्हिक्टर ऑर्बन यांच्याबरोबर प्रे. ट्रम्प यांचाही पराभव झाला.
भारताशी तुलना
हंगेरीतील सत्ताबदलाची भारतातील सध्याच्या राज्यपद्धतीशी तुलना केली जाते हा योगायोग नसावा. 16 वर्षे सत्तेत असलेल्या व्हिक्टर ऑर्बन यांनी जनतेला ‘राष्ट्रवाद’ वगैरेंचे खूळ लावून नादावले. ‘मीच एक राष्ट्रवादाचा सेनापती व देशाचा तारणहार’ अशी जोरदार प्रसिद्धी सुरू केली. त्यांचा ‘फिडेस’ पक्ष अजिंक्य आहे व त्याचा पराभव करणे शक्य नाही, अशी हवा युरोपीयन राष्ट्रांत खेळवत ठेवली. जे भारतात घडताना दिसत आहे तेच हंगेरीत 2010 पासून घडू लागले. बहुमताच्या जोरावर मूळ संविधान संपवले व स्वत-ला हवे तसे बदल करून नवीन संविधान व्हिक्टर साहेबांनी बनवले. न्याय व्यवस्था मुठीत घेतली. माध्यमांवर 90 टक्के नियंत्रण मिळवले आणि ‘क्रोनी कॅपिटॅलिझम’च्या (भांडवलशाही मित्रवाद) जोरावर सार्वजनिक संपत्ती आपल्याच लोकांच्या खिशात घातली.
व्हिक्टर ऑर्बन यांनी त्याच्या कारकीर्दीत त्यांच्या देशात काय केले ते पहा, मग भारताशी तुलना का? त्याचा उलगडा होईल.
पत्रकारितेवर ताबा – स्वतंत्र पत्रकारितेवर बंधने आणली. समाज माध्यमांवर सरकारविरोधी मतप्रदर्शन करणाऱ्यांना धमक्या दिल्या. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. सरकारवर टीका हा राष्ट्रीय अपराध ठरवला. अनेक ‘मीडिया हाऊस’ सरकार समर्थक उद्योगपतींच्या ताब्यात आले. जे सरकारचे समर्थन करतात, त्या चॅनल्स व वर्तमानपत्रांनाच सरकारी जाहिरातींचा खुराक मिळू लागला.
भ्रष्टाचार अमर्याद – मोजक्या उद्योगपती मित्रांना मालामाल करण्याची मोहीम राबविण्यात आली. सर्व सरकारी कंत्राटे व फायदा आपल्याच लोकांना देण्यात आला. ही सर्व बेनामी संपत्ती व्हिक्टर ऑर्बन यांचीच असल्याचे सांगितले जाते.
निवडणुका जिंकण्यासाठी सर्वकाही – निवडणुका जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गाने देणग्या गोळा केल्या. विरोधकांना निवडणुका अडचणीच्या ठरतील अशा पद्धतीने मतदारसंघांची रचना करून घेतली. स्वत:च्याच पक्षाचा फायदा व्हावा, अशा पद्धतीने निवडणुकांत पक्षपात व भ्रष्टाचार केला. त्यात हंगेरीचा निवडणूक आयोगही सहभागी झाला.
भीतीचे राज्य – मतदारांत व जनतेत सतत भ्रम आणि भीती निर्माण केली. लोकांना धर्मांध केले. एका मोठ्या दुष्मनाचा आभास उभा केला. (भारतात मुसलमान व पाकिस्तानचे भूत उभे केले तसे.) शरणार्थी, परदेशी नागरिक आणि बुद्धीवादी, उदारमतवादी लोकांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरवण्यात आले. अशा विचारांच्या लोकांमुळे देश संकटात येईल असा अपप्रचार करण्यात पंतप्रधान व्हिक्टर आघाडीवर होते.
न्याय व्यवस्थेवर ताबा – देशाच्या न्याय व्यवस्थेला एक प्रकारे गुलाम आणि हतबल बनवण्यात आले. ‘फिडेस-केडीएनपी’ या आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांना व चमच्यांना न्याय यंत्रणेच्या सर्वोच्च पदी बसवले. न्यायमूर्तींच्या नियुक्त्या व निवृत्तीच्या नियमांत बेजबाबदार पद्धतीने बदल केले. कायद्याचे राज्य कमजोर केले.
अर्थव्यवस्था मेली – व्हिक्टर यांना अर्थव्यवस्थेतले काहीच कळत नव्हते. त्यांच्या काळात अर्थव्यवस्था मंदावली, महागाई वाढली, नोकऱ्या कमी झाल्या, सार्वजनिक सेवा कोलमडल्या. आर्थिक व कायद्याच्या बजबजपुरीमुळे युरोपीयन निधी गोठवला गेला.
सेंट्रल व्हिस्टा – भारतात पंतप्रधान मोदी यांनी Central Vista सारखा प्रशासकीय पुनर्रचनेचा प्रकल्प राबवला. नवी संसद, नवे पंतप्रधान कार्यालय, नव्या प्रशासकीय इमारती उभ्या केल्या. इंग्रजी राजवटीच्या खुणा पुसण्याचा हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उद्योग व्हिक्टर यांनीदेखील हंगेरीच्या ‘बुडापेस्ट’ या राजधानीत सुरू केला. ऑर्बन यांनी बुडा कॅसल आणि Liget प्रकल्पाद्वारे राजधानीला आपल्या पद्धतीने सजवले. सत्तेवरील पकड मजबूत करण्यासाठीच हे खर्चिक प्रकल्प निर्माण केले. अखेर मतदारांनी हे प्रकल्प नाकारले.
हंगेरी ही नकली राष्ट्रवादाची युरोपीयन प्रयोगशाळा होती. भारतात सदैव ‘घुसखोरां’विरोधी मोहीम चालवून राष्ट्रवादाला हवा दिली जाते. तोच प्रकार व्हिक्टर व त्यांच्या लोकांनी हंगेरीत केला. व्हिक्टरच्या काळात कर्मठ, धर्मांध राष्ट्रवादाला चालना मिळाली. त्याच प्रकारचे राजकारण लोकप्रिय ठरले.
ऑर्बन कर्मठ राजकीय विचारांचे युरोपातील ‘पोस्टर बॉय’ ठरले. काही लोक व्हिक्टर यांना पोप आणि जीझसच्या वर मानू लागले. प्रे. ट्रम्पही व्हिक्टर यांचे चाहते बनले. त्यामुळे उपराष्ट्रपती वान्स यांनी व्हिक्टर ऑर्बन यांचा उघड प्रचार केला. वान्स त्यांच्या सभांतून प्रे. ट्रम्प यांना फोन लावत आणि स्पीकर फोन माईकला जोडून ट्रम्प यांचे भाषण जनतेला ऐकवीत. अमेरिकेसारख्या महासत्तेच्या आपण इतके जवळ आहोत हे दाखवण्याची एकही संधी व्हिक्टर ऑर्बन सोडत नव्हते.
पीटर मग्यार
16 वर्षे अमर्याद बेफाम सत्ता उपभोगल्यानंतर व्हिक्टर ऑर्बन यांचा दारुण पराभव पीटर मग्यार यांच्या ‘तिस्झा’ पक्षाने केला. 199 पैकी 138 जागा पीटर मग्यार यांच्या पक्षाने जिंकल्या. व्हिक्टर ऑर्बन यांना पराभव स्वीकारावा लागला. इतके हंगेरीयन जनमत तीव्र होते. पीटर यांनी ‘इलेक्टोरल आाटोक्रसी’विरुद्ध (मतदानातून लादलेली हुकूमशाही) आवाज उठवला व लोकांच्या मदतीने हुकूमशाहीचा पराभव केला. हंगेरीने जगाला दाखवून दिले की, हुकूमशहाने कितीही तटबंदी केली तरी मतदार एकत्र आले तर हुकूमशाहीची वीट आणि वीट उद्ध्वस्त करता येते. ‘आम्ही हंगेरी रिजिमला उद्ध्वस्त करणार आहोत’ अशी घोषणा पीटर मग्यार यांनी प्रथम दिली, तेव्हा हे शक्य नाही असे लोकांना वाटले. हंगेरीच्या ग्रामीण भागात त्यांनी रोज सहा सभा घेतल्या. लोकांचा वैताग चेहऱ्यावर दिसत होता. पीटर मग्यार यांनी वैतागलेल्या लोकांना आत्मविश्वास दिला. हंगेरीचा विजय हा तेथील सामान्य नागरिकांचा विजय आहे. हंगेरीने सिद्ध केले, लोकशाही कधीच संपत नाही. ती फक्त झोपते. लोकांचे डोळे उघडतात तेव्हा हुकूमशाहीला पळून जावे लागते.
हंगेरीप्रमाणे भारताची लोकशाही सध्या झोपलेली आहे. येथील व्हिक्टर ऑर्बन यांनी लोकशाहीला धर्माची, राष्ट्रवादाची भांग पाजली आहे, पण तीदेखील उतरेल व जनता जागी होईल.
पीटर मग्यार यांनी लोकशाहीसाठी आशेचा किरण जागवला आहे. लोकांना त्यांचा संदेश होता, “घाबरू नका, डरो मत.” 16 वर्षे हंगेरीच्या जनतेने धर्मांधतेच्या नशेत आणि दहशतीत व्यतीत केली. ते भयंकर पर्व संपले. लोक आता आनंदाने नाचत आहेत. देशभक्तिपर गाणी गात रस्त्यावर उतरत आहेत. गाड्यांचे हार्न वाजवून उत्सव साजरा करत आहेत. एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. मग्यार यांनी विजयानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली. साडेतीन तास उभे राहून ते पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत होते.
मग्यार यांना पत्रकारांनी विचारले, “व्हिक्टर ऑर्बन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकणार काय?” मग्यार यांनी शांतपणे उत्तर दिले, “पंतप्रधानांचे काम कोणाला तुरुंगात टाकणार हे नाही. न्यायालयाने निष्पक्ष पद्धतीने त्यांचे काम करावे. न्यायालयाने निष्पक्ष रीतीने काम करावे यासाठी मी त्याच्या पाठीशी उभा राहीन. कोणाला तुरुंगात पाठवायचे याचा निर्णय न्यायालय करेल. मी देश घडविण्याचे काम करीन.”
निकालानंतर मग्यार म्हणाले ते महत्त्वाचे- “आज रात्रभर विजय साजरा करू. उद्या कामाला लागू.”
लोकशाही व नेता असाच असतो.
भारताच्या व्हिक्टर ऑर्बन यांनी हंगेरीतील घडामोडींचा अभ्यास केला पाहिजे!
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]


























































