
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याबद्दल विरोधकांवर दोषारोप करणाऱया भाजप व पंतप्रधान मोदींवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज जोरदार हल्ला चढवला. ‘संसदेत उभे राहून महिलांचे मसीहा म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस आणि मणिपूरमधील अन्यायाचे काय,’ असा रोकडा सवाल प्रियांका यांनी केला.
मतदारसंघ पुनर्रचना, घटनादुरुस्ती आणि महिला आरक्षण विधेयकांच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारने बोलावलेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आज सूप वाजले. दोन तृतीयांश बहुमताअभावी घटनादुरुस्ती विधेयक फेटाळले गेले. त्यामुळे वाढीव मतदारसंघांसह महिला आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न फसला. प्रियांका गांधी यांनी पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱयांच्या आरोपांना व नरेटिव्हला उत्तर दिले.
विरोधकांना महिलाविरोधी ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आता काळ बदललाय. लोक हुशार झालेत. पहिल्यासारखं आता पीआर आणि मीडियाची जाहिरातबाजी चालणार नाही. अमित शहांच्या आश्वासनांवर तर कुणी विश्वासच ठेवणार नाही.
कायमस्वरूपी सत्ता ताब्यात घेण्याचा डाव फसला!
मोदी सरकारने आणलेले विधेयक महिला आरक्षणाचे नव्हतेच. ते मतदारसंघ पुनर्रचना विधेयक होते. जातीयनिहाय लोकसंख्या विचारात न घेताच सरकारला ते लागू करायचे होते. हा सरळसरळ अन्याय होता. विरोधकांनी या विधेयकांना पाठिंबा देणे शक्यच नव्हते,’ असे प्रियांका म्हणाल्या. ‘विरोधक एकजूट झाल्यास सरकारला हरवू शकतात हे काल देशाने पाहिले,’ असे म्हणत प्रियांका यांनी विधेयके नामंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
– ‘महिलांच्या बाबतीत भाजपचा इतिहास चांगला नाही. संसदेत उभे राहून महिलांच्या बाजूने बोलून तो बदलणार नाही. देशातील महिलांना सगळे कळून चुकले आहे. त्या सगळे काही पाहत आहेत. त्यांनी उन्नाव बलात्कार, हाथरस प्रकरण पाहिले. रस्त्यावर न्याय मागणाऱया ऑलिम्पिकच्या खेळाडूंचे काय झाले ते पाहिले. मणिपूरमध्ये निर्वस्त्र करण्यात आलेल्या महिलांना पाहिले. भाजप किंवा मोदी सरकारने कधी या महिलांना विचारले का? आता महिलांचे कैवारी बनायला चालले आहेत. ते इतपं सोपं नाही,’ असे प्रियांका यांनी सुनावले.
























































