
>> संध्या शहापुरे
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी… या ओळीमागे एक सुंदर कथा आहे. एकदा त्रेतायुगात शुलपाणी म्हणजे शिव आणि पार्वती म्हणजे शैलजा अगस्ती ऋषींकडे गेले. ऋषींनी त्यांना विस्ताराने रामकथा सांगितली. शिवशंकराच्या मनात त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. मनुष्य रूपातले श्रीराम व्याकूळ, दुःखी होऊन दंडकारण्यात सीतेचा शोध घेत होते.
ही वेळ श्रीहरीला म्हणजे श्रीरामाला भेटण्यासाठी योग्य नाही म्हणून शंकराने आपला परिचय श्रीरामाला दिला नाही. केवळ दूरुन दर्शन झाल्याने शिव भगवान आनंदीत झाले. पार्वतीला हे रहस्य माहीत नव्हते. तिला आश्चर्य वाटलं. यावर त्यांनी पार्वतीला सांगितलं. तुझ्या मनात शंका असेल तर तू स्वतः जाऊन परीक्षा का घेत नाहीस? त्या दाक्षायणीने सीतेचे रूप घेतले आणि सीतेचा शोध घेणाऱ्या मनुष्य रूपातल्या प्रभू रामचंद्राच्या वाटेने ती पुढे जाऊ लागली. सतीने घेतलेले बनावटी रूप लक्ष्मणाने व रामानेही जाणले आणि तिला प्रणाम केला. सती पार्वती संकोचली आणि घाबरून भोलेनाथांकडे गेली. सतीच्या मनात भक्तीविषयी शंका उत्पन्न झाल्यामुळे शिवशंकराने सतीचा त्याग केला. हा श्रीरामाच्या भक्तीचा महिमा या कथेत सांगितला आहे. श्रीराम अवतार देवादिकांचे रक्षण करणारा आहे. शिवपार्वतीलाही वंदनीय – पूजनीय आहे. तर मग प्रभू रामचंद्र रामभक्तांची उपेक्षा कशी काय करतील?
महा संकटी सोडिले देव जेणे।
प्रतापे बळे आगळा सर्वगुणे ।
जयाते स्मरे शैलजा शूल पाणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।।


























































