
<<प्रांजल वाघ>>
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘दक्षिण दिग्विजय’दरम्यान त्यांनी निर्माण केलेला दुर्ग म्हणजे सुबापूर किल्ला. हा किल्ला दक्षिणेकडील मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. या किल्ल्याला सोमापूर किल्ला असेही म्हटले जाते.
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिह्यामध्ये अनेक ऐतिहासिक दुर्ग दडलेले आहेत, त्यापैकी सौंदत्ती तालुक्यातील सुबापूर किल्ला हा मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. इतिहासकारांच्या मते, हा किल्ला केवळ लष्करी चौकी नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘दक्षिण दिग्विजय’दरम्यान त्यांनी निर्माण केलेला दुर्ग आहे!
इ.स. 1675-77 च्या सुमारास जेव्हा शिवरायांनी दक्षिणेतील स्वराज्याचा विस्तार केला, तेव्हा त्यांनी स्थानिक आदिलशाही सत्तेला शह देण्यासाठी या किल्ल्याची उभारणी किंवा डागडुजी केली असं चाचडी देसाई घराण्याच्या दस्तावेजात लिहून ठेवलं आहे. याकामी चाचडीच्या देसाई घराण्याने महाराजांना मोलाची मदत केली होती. या किल्ल्याचे खरे नाव तसं कोणाला ठाऊक नाही, पण गावाच्या ‘सुबापूर’ नावावरूनच या किल्ल्याला ओळखले जाते. बेळगावच्या पूर्वेस डोंगरावर वसलेला हा किल्ला घटप्रभा आणि मलप्रभा नदींच्या मधील प्रदेशावर लक्ष ठेवून आहे.
किल्ल्याला सुमारे 18 भक्कम बुरुजांनी तो सुरक्षित केला आहे. उत्तरेस किल्ल्याचे गोमुखी द्वार मराठा शैलीची आठवण करून देतो. किल्ल्याच्या दक्षिणेला दुहेरी तटबंदी बांधून किल्ला सुरक्षित केला आहे. इथले वैशिष्टय़ म्हणजे या भिंती आणि बुरुज हे काळजीपूर्वक रचलेल्या दगडांच्या भिंती आहेत. त्यांना कशानेही बांधलेले नाही. त्या काळी बांधकाम पर्यावरणपूरक होते, याची साक्ष इथे पादोपदी मिळते.
किल्ल्यावर पाण्याचे सहा मोठी टाकी आहेत. कोणत्याही गडाचे प्राण म्हणजे पाणी आणि सुबापूरमध्ये आजही हे हौद इतिहासाची साक्ष देतात. राणी चेन्नमाच्या लढय़ादरम्यान इंग्रजांनी हा किल्ला उद्ध्वस्त केला होता, ज्याचे अवशेष आजही पाहता येतात. या किल्ल्याचा सध्या फक्त एक गोल बुरुज चांगल्या अवस्थेत शिल्लक आहे. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला दुहेरी भिंत आहे. कदाचित इथे आणखी एक प्रवेशद्वार असावे. बेळगावपासून सुमारे 67 किमी आणि सौंदत्तीपासून 35 किमी अंतरावर असणाऱ्या किल्ल्यावरून सुबापूरचे संपूर्ण दर्शन घडते. कर्नाटक सरकारने या किल्ल्यात दुरुस्तीचे काम केले आहे. मात्र या स्मारकाच्या जतनासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत.
गडाच्या मध्यभागी पडझड झालेली एक वाडासदृश वास्तू आजही मराठा संस्कृतीची ओळख जपून आहे. पेशवे काळातही या किल्ल्याचा वापर टिपू सुलतानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. 1818 मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. मात्र त्याची भक्कम तटबंदी आजही पर्यटकांना थक्क करते!

























































