IPL 2026 – हैदराबादचा ‘यलो आर्मी’ला दे धक्का; शेवटच्या षटकात चेन्नईवर थरारक विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात कमकुवत गोलंदाजीचे लेबल लागलेल्या सनरायझर्स हैदराबादने शनिवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आपली ताकद दाखवून दिली. घरच्या मैदानावर सीएसके… सीएसके…. अशा गगनभेदी गर्जना घुमत असतानाही हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी थरारक पराभव केला. हैदराबादने 195 धावांचा बचाव करताना चेन्नईला 184 धावांत रोखले आणि यंदाच्या हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. यामुळे हैदराबादचा संघ गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

चेन्नईला विजयासाठी शेवटच्या षटकात 18 धावांची गरज होती. हैदराबादचा कर्णधार ईशान किशन याने चेंडू पहिला सामना गाजवणाऱ्या मराठमोळ्या प्रफुल हिंगेकडे सोपवला. पहिल्या 3 षटकात 54 धावा देणाऱ्या हिंगेवर प्रचंड दडपण होते. त्यातच तिसऱ्या चेंडूवर त्याने कंबरेच्या वर नो-बॉल टाकला आणि हैदराबादच्या गोटात धाकधूक वाढली. मात्र, मोक्याच्या क्षणी हिंगेने जबरदस्त पुनरागमन करत पुढचे तीन चेंडू अचूक टाकले आणि चेन्नईला विजयापासून रोखले.

हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 195 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने पॉवरप्लेमध्ये तुफानी सुरुवात केली होती. युवा खेळाडू आयुष म्हात्रेने अवघ्या 13 चेंडूंत 30 धावा कुटल्या. मात्र पाचव्या षटकात तो जायबंदी झाला आणि त्याच षटकात क्लासेनकडे झेल देऊन तो बाद झाला. तिथूनच चेन्नईची लय बिघडली. कर्णधार ऋतुराज गायकवाडही स्वस्तात बाद झाला. शॉर्ट आणि सरफराजने थोडीफार झुंज दिली, मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या मधळ्या फळीला जखडून ठेवले. हैदराबादकडून सर्वाधिक 3 विकेट्स मलिंगाने घेतले, त्याला नितीश कुमार रेड्डीने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. हिंगे, हुसैन आणि शिंवाग कुमारने प्रत्येक 1 विकेट्स घेतली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माने चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने अवघ्या 15 चेंडूंत अर्धशतक झळकावत हैदराबादला मोठी धावसंख्या उभारून दिली. जेमी ओव्हर्टन याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन याने कर्णधार गायकवाड याला डीआरएस घ्यायला लावला आणि धोकादायक अभिषेक शर्मा बाद झाला. त्यामुळे हैदराबादला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. हैदराबादचा संपूर्ण डाव 9 बाद 194 वर आटोपला.

IPL 2026 – दिल्लीचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय; स्टब्ज, मिलरची मोक्याच्या वेळी फटकेबाजी